
मुंबई सेंट्रल येथील अब्दुल रहेमान सुफी मैदानातील (झुला मैदान) आखाडा व व्यायाम शाळा ताब्यात घेण्याच्या महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली.
बॉम्बे यंग मेन्स क्रिस्टियन असोसिएशनकडे या दोन्ही वास्तू आहेत. पालिकेने असोसिएशनला नोटीस धाडून कारवाईचा इशारा दिला. याविरोधात असोसिएशनने अॅड. जोऐल कार्लोस यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 1928पासून या जागेचा ताबा आमच्याकडे आहे. या बांधकामाला पालिकेनेच परवानगी दिली आहे. स्थानिक नगरसेविका अमरीन अब्रहानी यांच्या तक्रारीमुळे पालिकेने ही कारवाई सुरू केली असल्याचे अॅड. कार्लोस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
यावर न्यायालय संतप्त झाले. पालिका हे सर्व कशासाठी करत आहे. येथील गरीबांचे टेंडर श्रीमंतांना द्यायचे आहे का, असा सवाल खंडपीठाने केला. या याचिकेचे उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले व ही कारवाई स्थगित केली.
खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते
आमची संस्था 1857पासून कार्यरत आहे. झुला मैदानातील आखाडा, व्यायाम शाळेचे बांधकाम असोसिएशनने केले आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी असोसिएशन कार्यरत असते. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी येथे सराव केला आहे. आमचे बांधकाम पालिका ताब्यात घेऊ शकत नाही. ही कारवाई रद्द करावी, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.





























































