गोवा हायवेवरील पुलांच्या कामासाठी 31 ऑगस्टची डेडलाईन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास विनाअडथळा होण्यासाठी महामार्गावरील उड्डाणपुलांची रखडलेली कामे कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. इंदापूर बायपासवरील एकेरी वाहतूक सुरू करण्याबरोबरच माणगाव बायपासवरील साडेपाच किमी लांबीचा रस्ता सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बुधवारी मंत्रालयात पुन्हा एकदा बैठक घेतली. मागील आठवडय़ातही त्यांनी महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील खचलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी आयआयटीची मदत घेतली जात आहे. आयआयटीचा तांत्रिक अहवाल आल्यावर उड्डाणपुलाची दुरुस्ती होईल. तोपर्यंत पुलाच्या खालील दोन्ही बाजूंकडील महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले. महामार्गावरील कोलेटी, संगमेश्वर, निवळी, लांजा या उड्डाणपुलांची कामे 31 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश या बैठकीत दिले.

माणगावला साडेपाच किमीचा बायपास सुरू

माणगाव बायपासवरील एकेरी वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा सुमारे 7.5 किमीचा मार्ग 5.5 किमीपर्यंत एकमार्गी सुरू करणे शक्य होणार आहे. त्याच्या पुढील टप्प्यासाठी 20 ऑगस्टपासून मेगाब्लॉक घेऊन रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. गर्डर टाकून पूर्ण होताच पुढील कामही वेगाने पूर्ण करून उर्वरित दोन किमीचा मार्गही एकमार्गी वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल.

चिपळूण उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचे प्रयत्न

चिपळूण येथील सर्वात मोठा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे कामही वेगाने केले जात आहे. या उड्डाणपुलावरील गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून प्रांत कार्यालयाजवळील भरावाचे कामही वेगाने पूर्ण केले जाईल. पावसाने उसंत दिल्यास गणेशोत्सवाआधी हाही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.