
मुंबई : पालिकेच्या शिक्षण विभागातर्फे गोवंडी येथे मुंबई पब्लिक स्कूल शिवाजी नगर इंग्रजी शाळा क्र. ०१ सुरू झाले आहे. शाळा महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रमाची असून यामध्ये इयत्ता ज्युनियर केजी ते ४ थीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या शाळेमध्ये गोवंडी व परिसरातील अनधिकृत शाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार आहे.
राणीबागचा विघ्नहर्ता मंडळाचे रक्तदान शिबीर
मुंबई : पालनजी रतनजी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ‘राणीबागचा विघ्नहर्ता’च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नायर रुग्णालय रक्तपिढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर राबवण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत भायखळा पूर्वेतील राणीबागच्या लुणावा भवन येथे हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू, मोफत व्हिजन सोर्स नेत्र तपासणी, दृष्टी तपासणी, रंग अंधत्व, मोतीबिंदू व पॉवर आय चष्मा सवलतीच्या दरात दिला जाणार आहे.
वाघेरी ग्रामविकास मंडळाची वार्षिक सभा
मुंबई : वाघेरी ग्रामविकास मंडळाच्या वतीने सर्वसाधारण वार्षिक सभेचे आयोजन केले आहे. यंदा सभेचे ४६ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वाजता भांडुपच्या छत्रपती शिवाजी महाराज तलावाजवळील सह्याद्री विद्यामंदिर येथे ही सभा पार पडणार आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी सर्वांना आपले विचार मांडता यावेत यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सरचिटणीस डॉ. संतोष रावराणे व प्रसिद्धी प्रमुख सुरेश ठुकरुल यांनी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. संतोष रावराणे ९८६९३८११८९.






























































