अखेर ठाण्याच्या महापौर गणेश मंडळांना भेटणार; 21 ऑगस्टला पदाधिकाऱ्यांसोबत पालिका मुख्यालयात बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखेर ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर गणेश मंडळांना भेटणार आहेत. येत्या २१ ऑगस्टला ठाण्यातील गणेश मंडळांसोबत पालिका मुख्यालयात बैठक होणार असून गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर मंडळांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने महापौरांना दोन वेळा पत्र देऊन बैठकीला महापौरांना वेळ नसल्याची खंत मंडळांनी बोलून दाखवली होती. यासंदर्भात दैनिक ‘सामना’ने आवाज उठवताच महापौरांना जाग आली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने बैठकीची अधिसूचना काढली असून सर्व यंत्रणा आणि गणेश मंडळांना बैठकीचे तत्काळ निमंत्रण धाडले आहे.

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे ३० दिवस उरले असून गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडळांची जोरदार लगबग सुरू आहे. उत्सवाच्या नियोजनासंदर्भात ठाण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय परवानग्यांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येते. यंदा बैठक होणार की नाही, असा प्रश्न सर्व गणेश मंडळांसमोर उपस्थित झाला असताना गणेशोत्सव समन्वय समितीने महापौरांना बैठक घेण्याचे दोन वेळा पत्र देऊन आठवण करून दिली आहे.

दरम्यान मंडळांशी बोलायला महापौरांना वेळच नसल्याने मंडळांनीदेखील नाराजी व्यक्त केली होती. ‘गणेश मंडळांशी बोलायला महापौरांना वेळच नाही’ या मथळ्याखाली दैनिक ‘सामना’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

अधिकारी, पोलीस, महावितरण, मूर्तिकारांना आमंत्रण

पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या अनुषंगाने पालिकेने केलेल्या उपाययोजना तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उद्भवणाऱ्या समस्या याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला पालिकेचे अधिकारी, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, महावितरणचे अधिकारी, टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी व मूर्तिकार यांना २१ ऑगस्टच्या बैठकीचे आमंत्रण दिले.