
स्पायडरमॅन
चंद्रावर कायमस्वरूपी मानवी उपस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने वेग वाढवला आहे. संस्थेने ‘मून बेस’ उभारण्यासाठी रोबोटिक मोहिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्याची योजना जाहीर केली असून 2027 पासून तीन वर्षांत तब्बल 30 रोबोटिक लँडिंग्ज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक उपकरणे, रोव्हर आणि इतर तंत्रज्ञान पोहोचवले जाणार आहे. त्यांचा उद्देश भविष्यातील मानवी मोहिमांसाठी आवश्यक संसाधने आणि पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे. विशेषत-चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला महत्त्व दिले जात आहे. या भागातील कायम सावलीत असलेल्या प्रदेशांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता आहे. भविष्यात हे पाणी पिण्यासाठीच नव्हे, तर ऑक्सिजन आणि रॉकेट इंधन तयार करण्यासाठीही उपयोगी ठरू शकते. NASA ने मे 2026 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काम करणाऱ्या मानवी आणि रोबोटिक मोहिमांसाठी नवे रोव्हर आणि मालवाहू लँडर विकसित करण्यासाठी करारही जाहीर केले. काही नवीन प्रणालींचे प्रक्षेपण 2028 पासून करण्याचे लक्ष्य आहे.
याचबरोबर 2027 मधील Artemis III मोहिमेत पृथ्वीच्या कक्षेत महत्त्वाच्या तंत्रज्ञानाची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर 2028 मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याची तयारी आहे. चंद्रावर पाय ठेवणे ही आता केवळ वैज्ञानिक कामगिरी राहिलेली नाही. पाणी, ऊर्जा, निवास आणि वाहतूक यांसारख्या सुविधा उभारून चंद्राला भविष्यातील अंतराळ संशोधनाचा तळ बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. मानवाची चंद्रावरील दुसरी वसाहत कधी उभी राहील, हे अद्याप निश्चित नसले तरी तिची पायाभरणी मात्र वेगाने होत आहे.
या प्रकल्पात उद्योग, विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांनाही सहभागी करून घेण्याचा NASA चा प्रयत्न आहे. त्यामुळे चंद्रावरील भविष्यातील तळासाठी आवश्यक संचार व्यवस्था, ऊर्जा निर्मिती, वाहतूक आणि संसाधनांचा वापर यांसारख्या तंत्रज्ञानाची चाचणी प्रत्यक्ष पृष्ठभागावरच करता येणार आहे. हे संशोधन पुढील मंगळ मोहिमांसाठीही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.































































