
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन भीषण अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाले असून कळंबोली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पहिली घटना केंद्रीय वखार महामंडळ येथील स्टील मार्केट रोडवर घडली. कळंबोली येथे राहणारे अमित पवार (३७) हे दुचाकीवरून कळंबोली सर्कलकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे अमित पवार याचा तोल जाऊन तो थेट ट्रेलरच्या मागील चाकाखाली आला. या भीषण अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दुसरी घटना एक्स्प्रेस-वेकडे जाणाऱ्या मार्गावर देवांशी इन हॉटेलसमोर घडली. एका अनोळखी व्यक्तीला वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर संबंधित व्यक्ती वाहनाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. या जखमी व्यक्तीला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.






























































