India vs Sri Lanka 1st Test – हिंदुस्थानची प्रथम फलंदाजी; सरफराज खान, आकिब नबीला प्लेइंग 11 मध्ये स्थान नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात आज नवीन अध्याय जोडला गेला आहे. शनिवार 15 ऑगस्ट, 2026 ला हिंदुस्थानचा संघ श्रीलंकेविरुद्ध गॉल आंतरराष्ट्रीय मैदानावर 600 वा कसोटी सामना खेळायला उतरला. या कसोटीत कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच हिंदुस्थानचा संघ स्वातंत्र्यदिनी कसोटी सामना खेळणार असल्याने या सामन्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.

फिरकीला साथ देणाऱ्या गॉलच्या खेळपट्टीवर हिंदुस्थानने मधल्या फळीत सरफराज खानऐवजी ध्रुव जुरेलला, तर गोलंदाजीत रवींद्र जडेजा, मानव सुथार आणि कुलदीप यादव तीन विशेषज्ज्ञ फिरकीपटूंना संधी देण्यात आले आहे. तर वेगवान जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीमध्ये गोलंदाजीची धुरा प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर आहे. आकिब नबी आणि गुरनूर ब्रार यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या दृष्टीने हिंदुस्थानसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, गॉलेमधील परिस्थिती हिंदुस्थानसाठी सोपी नसेल. येथील खेळपट्टी फिरकीपटूंना मोठी मदत करण्याची शक्यता असून, वळण घेणाऱ्या खेळपट्ट्यांवर हिंदुस्थानी फलंदाजांची गेल्या काही काळात चांगलीच फजिती झाल्याचे पाहायला मिळाले आहे. श्रीलंकेचे फिरकीपटू याचा फायदा घेण्याचा नक्कीच पूर्ण प्रयत्न करतील. त्यामुळे हिंदुस्थानी संघासाठी ही मोठी परीक्षा ठरणार आहे.

हिंदुस्थानच्या फलंदाजीची मुख्य जबाबदारी केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्यावर असेल. तर चौथ्या क्रमांकावर देवदत्त पडिक्कल उतरण्याची शक्यता आहे. तर फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऋषभ पंत एक्स फॅक्टर ठरू शकतो. आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे तो कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो. त्यानंतर ध्रुव जुरेल आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्या खांद्यावर हिंदुस्थानच्या फलंदाजीची मदार असणार आहे.

हिंदुस्थानचा संघ – 

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, देवदत्त पड्डिकल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा

श्रीलंकेचा संघ –

लाहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चांदीमल, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा (कर्णधार), सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा आणि असिथा फर्नांडो