बालासोरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान दुर्घटना; वीजेचा धक्का लागून शिक्षकाचा मृत्यू, तीन विद्यार्थी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील सिमुलिया ब्लॉकमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या तयारीदरम्यान एक दुर्दैवी दुर्घटना घडली असून, वीजेचा धक्का बसल्याने एका खासगी शाळेतील शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रियब्रत बेहरा असे मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव असून, ते जलेश्वर येथील रहिवासी होते आणि सिमुलियाच्या मैतापुर परिसरातील ‘रॉयल हायस्कूल’मध्ये कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी सुरू असताना शाळेच्या आवारात ध्वजस्तंभ उभारण्याचे काम सुरू होते. प्रियब्रत बेहरा हे एक लोखंडी पाईप बसवण्याचा प्रयत्न करत असताना तो पाईप डोक्यावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या संपर्कात आला. या तीव्र वीजप्रवाहामुळे बेहरा यांना जोरदार धक्का बसून ते गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी भद्रक मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेत जवळ असलेले इतर तीन विद्यार्थीही वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी सिमुलिया मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या बातमीने शाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.