
गणेशोत्सव मंडपासाठी रस्त्यावर खड्डे केल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपयांचा दंड पालिकेकडून वसूल केला जाणार आहे. हा दंड टाळण्यासाठी मंडळांनी अत्याधुनिक पद्धतीने रस्त्यावर खड्डा न खणता मंडप उभारावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यासाठी पालिकेने वेबसाइटवर खड्डेविरहित मंडप उभारणीची पद्धत उपलब्ध केली आहे.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. तर सवा दोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळ्या जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी मंडळांना पालिकेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागले. 14 ऑगस्टपासून ही परवानगी घेण्यासाठी पालिकेने https://portal.mcgm.gov.in ही वेबसाइट उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असून मंडप परवानगीची वैधता 26 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. मात्र मंडप उभारताना खड्डे केल्यास परिपत्रकानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
असे उभारा मंडप
उभ्या बांबू अथवा स्टील पाइप्सना कॉलमना आडव्या माईल्ड प्लेट वेल्ड केलेल्या पोकळ पाइप्सच्या सहाय्याने स्थिरता प्राप्त करता येते.
वाळू भरलेले ड्रम्स किंवा काँक्रिट ब्लॉक्सना वाळू, खडी आदींनी भरून उभ्या खांबांना आधार द्यावा.
धातू, उच्च घनता प्लॅस्टिक किंवा प्रिकास्ट काँक्रिटचे इंटरलॉकिंग बेस वापरावेत. ज्यामुळे मंडप स्थिर राहील.
स्टील अथवा लाकडी चौकटींना प्लेट्सनी आच्छादित केल्यास तयार केलेल्या मंडपाला स्थैर्य प्राप्त करता येईल.
























































