
राज्यात अन्न आणि औषधी विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नात भेसळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. आता गुजरातमध्येही अन्नपदार्थांमधील भेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाने सुरत आणि डीसा येथे छापे टाकून 35 लाख रुपयांहून अधिक किमतीचे संशयित भेसळयुक्त तूप आणि तेल जप्त केले. आरोग्यमंत्री प्रफुल पानशेरिया यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.
सुरतच्या कामरेज तालुक्यातील स्टॅड पर्डी येथील हिंदवा ड्रीम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये केवल फूड प्रॉडक्ट या कंपनीच्या कारखान्यावर अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या कारखान्यात वैध परवान्याशिवाय उत्पादन सुरू असल्याचे आढळले. तसेच अस्सल उत्पादनाच्या नावाखाली संशयित भेसळयुक्त तूप तयार करून त्याचे पॅकिंग केले जात असल्याचा आरोप आहे.
कारवाईदरम्यान ‘श्री अनमोल रतन काऊ घी’ या ब्रँडच्या नावाने पॅक केलेले 5,157 लिटर तूप जप्त करण्यात आले. या तुपाची किंमत सुमारे 26.12 लाख रुपये आहे. याशिवाय 3.63 लाख रुपये किमतीचे 1,485 किलो पामोलिन तेल आणि भेसळ करण्यासाठी वापरले जात असल्याचा असलेले 285 किलो सोयाबीन तेलही जप्त करण्यात आले.
जप्त करण्यात आलेल्या सर्व उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हा कारखाना बाहेरून बंद असल्याचे भासवले जात होते. मात्र, परिसराच्या आत उत्पादन आणि पॅकिंगचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांना आढळले.
दरम्यान, अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाच्या पालनपूर सर्कलच्या पथकाने डीसा शहरातील विविध आस्थापनांवर छापे टाकले. या कारवाईदरम्यान 987 लिटर संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत 6,22,200 रुपये आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत कायदेशीर नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील तपासणीच्या निष्कर्षांच्या आधारे संबंधितांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

























































