खेलो 24 मॅच’ने केले ‘आऊट’, ऑनलाइन गेमिंगच्या नादात तरुणाने गमावले सवा कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन गेमिंगच्या नादी लागू नका. कोणत्याही आक्षेपार्ह साइटवर क्लिक करू नका, असे वारंवार आवाहन करूनही अनेक जण फसतात. पनवेलच्या धाकटी जुई या गावात राहणाऱ्या वाणिज्य शाखेच्या एका पदवीधर तरुणाने ऑनलाइन गेमिंगच्या नादात थोडेथोडके नव्हे तर चक्क सवा कोटी रुपये गमावले आहेत. त्याने ‘खेलो २४ मॅच’ हा गेम खेळण्यास सुरू केली आणि या गेमनेच त्याला ‘आऊट’ केले. याप्रकरणी गेमिंग प्लॅटफार्मचा संचालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाकटा जुई येथे राहणाऱ्या तरुणाकडे वाहतूक व्यवसायासोबत जमीन विक्रीतून आलेली मोठी रक्कम होती. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ ते जुलै २०२६ या कालावधीत हा तरुण ऑनलाइन गेमिंगच्या संपर्कात आला. संबंधित संकेतस्थळ नोंदणीकृत असल्याचा समज झाल्यानंतर त्याने त्यावर स्वतःची नोंदणी केली. संकेतस्थळावर तीनपत्ती, कॅसिनो आणि इतर ऑनलाइन गेम उपलब्ध असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने आपल्याजवळील सर्व पैसे खेळात लावले. मात्र त्याची फसवणूक झाली.

ग्राहक प्रतिनिधीने घातला गंडा

गेमिंग कंपनीच्या ग्राहक प्रतिनिधीने केलेल्या मार्गदर्शनानुसार तरुणाने विविध व्यवहारांतून एकूण १ कोटी २७ लाख ३१ हजार २०२ रुपये संबंधित कंपनीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर या व्यवहाराबाबत संशय निर्माण झाल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.