ही तर अभिमानास्पद बाब, प्रशांत किशोर यांनी घेतली आमदारकीची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सोमवारी बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. पाटणा येथील बंकीपूर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारपदाची शपथ घेतली. बिहार विधानसभेत जन सुराज पक्षाचे एकमेव आमदार म्हणून त्यांचा औपचारिक प्रवेश झाला आहे.

शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभेचा सदस्य होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. बिहार आणि राज्यातील जनतेच्या हितासाठी काहीतरी अर्थपूर्ण काम करण्याचा संकल्प घेऊन आपण विधानसभेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“बिहार विधानसभेचा सदस्य होणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. समाज आणि राज्याच्या भल्यासाठी आपल्या आयुष्यातील अनेक मौल्यवान वर्षे समर्पित करणाऱ्या शेकडो आमदार आणि सदस्यांकडून प्रेरणा घेऊन बिहारच्या जनतेसाठी आणि राज्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे,” असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

बंकीपूरमध्ये भाजपचा बालेकिल्ला भेदला
बंकीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा 19,324 मतांनी पराभव केला. 1995 पासून बंकीपूर मतदारसंघ हा भाजपचा मजबूत गड मानला जात होता. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या विजयाकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पोटनिवडणुकीपूर्वी बंकीपूर विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त केली होती. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवत या मतदारसंघातील भाजपचे वर्चस्व मोडीत काढले.