2014 पासूनच्या सर्व परीक्षांची चौकशी करणार; झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांची घोषणा, ‘जेएसएससी-सीजीएल’ परीक्षा रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे नमते घेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी झारखंड लोक सेवा आयोग-सीजीएल परीक्षा रद्द केल्याची आज घोषणा केली. तसेच 2014 पासून झालेल्या सर्व लहान-मोठ्या परीक्षांबाबत सीआयडी चौकशी करण्यात येईल, असे सोरेन यांनी जाहीर केले.

सोरेन यांनी प्रमुख मंत्र्यांसोबत आज घेतलेल्या बैठकीनंतर परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. या घोटाळ्यात अनेक कंपन्यांचे जाळे असून या कंपन्यांनी वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे 2014 पासून सर्व परीक्षांबाबत सीआयडीमार्फत तपास करण्यात येईल, असे सोरेन म्हणाले. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थी नेते रवींद्र पासवान यांनी सांगितले.

परीक्षा घोटाळ्यातील मास्टरमाइंडला अटक करा – महतो

विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो म्हणाले की, तपास अतिशय बारकाईने होणे महत्त्वाचे आहे. यात गुंतलेल्या प्रत्येक भ्रष्ट व्यक्तीला अटक झाली पाहिजे. तसेच यामागे जे मास्टरमाइंड आहेत त्यांना पकडायला हवे.