
उत्तर बंगळुरूमधील चिक्काबणावर परिसरात ३४ वर्षीय व्यक्ती आणि त्याच्या पाच वर्षांच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला असून, यामागे दुहेरी हत्येचा मोठा कट उघडकीस आला आहे. पत्नीने तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने पतीची आणि पोटच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
अभिनंदन (वय ३४) आणि त्यांचा मुलगा यदुवीर (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. हरिणी असे त्या आरोपी महिलेचे नाव असून तिचे तिचा पतीसोबत झोपण्याच्या जागेवरून वाद झाला होता. या वादादरम्यान हरिणीने पती अभिनंदनला लाकडी चमच्याने मारहाण केली. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. वाद झाल्यानंतर हरिणीने तिचा कथित प्रियकर विनय याला घरी बोलावून घेतले. यानंतर त्या दोघांनी मिळून अभिनंदन यांच्यावर हल्ला करून त्याचा गळा आवळून हत्या केली. याच दरम्यान त्यांचा मुलगा यदुवीर अचानक जागा झाला. त्याने हा प्रकार पाहिल्याने दोघांनी मिळून उशीने त्याचे तोंड दाबून त्याचीही निर्घृण हत्या केली.
पोलिसांनी संशयावरून हरिणीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला. मृतदेह शवविच्छेदनानंतर मूळ गावी पाठवण्यात आले आहेत. आरोपी विनय सध्या फरार असून पोलीस कनकपुराजवळील हिरोहळ्ळी परिसरात त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

























































