इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर UAE चा मोठा निर्णय, तेहरानसोबतचे सर्व व्यापारी व आर्थिक संबंध तोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) इराणसोबतचे सर्व प्रकारचे व्यापारी व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाण पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे स्थगित केली आहे. इराणकडून डागण्यात आलेल्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्यानंतर यूएईने हे कठोर पाऊल उचलले असून, यामुळे आखाती देशांमधील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.

यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणकडून डागलेली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे देशाच्या दिशेने येत असल्याचे ट्रॅक केले होते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून यूएईमधील नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ हाय अलर्ट संदेश पाठवण्यात आला होता. तपासात ही क्षेपणास्त्रे सागरी जहाजांना लक्ष्य करण्यासाठी डागल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील एक क्षेपणास्त्र यूएईच्या सागरी सीमाभागात, तर दुसरे बाहेरील समुद्रात कोसळले. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

क्षेपणास्त्रांच्या या घटनेनंतर यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराणविरोधात थेट आर्थिक कारवाईचा बडगा उचलला. परराष्ट्र मंत्रालयाच्या संप्रेषण संचालक आफ्रा अल हमेली यांनी स्पष्ट केले की, प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला बाधा निर्माण झाल्याने इराणसोबतचा सर्व व्यापार, व्यावसायिक देवाणघेवाण आणि वित्तीय व्यवहार अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आले आहेत.

दुसरीकडे, इराणने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अशा प्रकारचे कोणतेही क्षेपणास्त्र डागले नसल्याचा दावा करत इराणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघाई यांनी यूएईचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.