लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिला गेम जिंकूनही हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सेनचा सामना अमेरिकेच्या गॅरेट टॅनबरोबर झाला. सेनने दमदार सुरुवात करूनही अखेरचे दोन्ही गेम गमावले. अमेरिकेच्या टॅनने सामन्यात दमदार पुनरागन करत सेनवर १९-२१, २१-१९, २१-१७ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले आहे.

पहिल्या गेममध्ये सेनचा खेळ चांगलाच बहरला होता. पहिला गेम २१-१९ असा जिंकल्यानंतर लक्ष्य सामन्यावर नियंत्रण राखताना दिसत होता. दुसरा गेम जिंकून त्याला विजय मिळवण्याची संधी होती. पण टॅन हार मानणारा नव्हता. दुसऱ्या गेममध्ये सेनने चांगली कामगिरी केली असली तरी टॅन त्याच्यापेक्षा वरचढ ठरला आणि त्याने दुसरा गेम २१-१९ असा जिंकला.

दोघांनीही प्रत्येकी एक गेम जिंकल्यामुळे सामन्याची रंगत वाढलेली होती; कारण हा तिसरा गेम निर्णायक ठरणारा होता. निर्णायक गेममध्ये टॅनने ११-४ अशी आघाडी घेतल्याने लक्ष्य अडचणीत सापडला. तरीही हिंदुस्थानच्या खेळाडूने हार मानली नाही. त्याने सलग सहा गुण मिळवत सामन्यात पुनरागमन केले आणि १७-१६ अशा फरकापर्यंत मजल मारली; पण निर्णायक क्षणी टॅनने संयम राखला. टॅनने १८-१६ अशी आघाडी पुन्हा मिळवली आणि त्यानंतर २०-१६ अशा गुणांसह ‘मॅच पॉइंट’ गाठला. लक्ष्यने एक मॅच पॉइंट वाचवला खरा, पण टॅनने २१-१७ अशा गुणांसह गेम जिंकून अनपेक्षित विजय साकारला.