
हिंदुस्थानचा युवा स्टार बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला. हिंदुस्थानची फुलराणी पी.व्ही. सिंधूही यावेळी मागे राहिली नाही. सिंधूनेही महिला एकेरी विभागात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष दुहेरीमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रानकी रेड्डी यांना पुढे चाल मिळाली असून त्यांनीही पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
आयुषने यापूर्वीच्या सामन्यात वर्ल्ड नंबर वन खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतरही आयुषने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. आयुषने उपउपांत्यपूर्व फेरीत श्रीलंकेच्या डी. अॅबेविक्रमाचा २१-८ आणि २१-१० असा फडशा पाडला. त्यामुळे आता आयुषने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यातील दोन्ही गेम्समध्ये आयुषचेच वर्चस्व पाहायला मिळाले. आयुषने दोन्ही गेम्समध्ये आक्रमक खेळ केला आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची एकही संधी दिली नाही.
सिंधूने महिला एकेरीत आपले विजयी सातत्य कायम ठेवले आहे. महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत कॅनडाच्या डब्ल्यू.
वाय. सँगवर २१-१६, २१-१७ असा सहज विजय मिळवला. आक्रमण आणि बचाव यांचा उत्तम मिलाप यावेळी सिंधूच्या खेळात पाहायला मिळाला.
पहिल्या गेममध्ये सिंधूने लीलया खेळ करत सँगला जास्त वरचढ होण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या गेममध्ये पुन्हा एकदा सिंधूने सँगवर वर्चस्व राखले आणि तिने २१-१६ असा विजय मिळवला. त्यामुळे सिंधूने आता उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीत चिराग आणि सात्विक साईराज यांचे प्रतिस्पर्धी खेळाडू मैदानात खेळण्यासाठी उतरलेच नाही आणि त्यामुळे त्यांना पुढे चाल देण्यात आली आहे.


























































