
दिग्दर्शक ख्रिस्टोफर नोलन यांच्या ‘द ओडिसी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे. मॅट डेमन अभिनीत या चित्रपटाने जगभरात तब्बल 1.352 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. त्यामुळेच हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा R-रेटेड चित्रपट ठरला आहे. या कामगिरीसह ‘द ओडिसी’ने ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा विक्रम मागे टाकला आहे.
‘द ओडिसी’ने उत्तर अमेरिका म्हणजेच अमेरिका आणि कॅनडामध्ये सुमारे 516 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपटाने 800 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक कमाई केली. याआधी सर्वाधिक कमाई करणाऱ्या R-रेटेड चित्रपटाचा विक्रम ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’च्या नावावर होता. या चित्रपटाने जगभरात सुमारे 1.338 अब्ज डॉलरची कमाई केली होती. ‘द ओडिसी’ 17 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत तब्बल 123 दशलक्ष डॉलरची कमाई केली होती. त्यानंतरही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम राहिली. जुलैमध्येच ‘द ओडिसी’ने 1 अब्ज डॉलरच्या कमाईचा टप्पा पार केला.
सध्या ‘द ओडिसी’ हा 2026 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील प्रदर्शनामुळेही चित्रपटाच्या कमाईला मोठी चालना मिळाली. चित्रपटाचे प्रदर्शन पूर्ण होईपर्यंत त्याची कमाई 1.5 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘द ओडिसी’ने ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा विक्रम मोडल्यानंतर अभिनेता रायन रेनॉल्ड्सनेही या यशाचे कौतुक केले. त्याने सोशल मीडियावर आपल्या 2024 मधील चित्रपटाची एक क्लिप शेअर करत ‘द ओडिसी’च्या संपूर्ण कलाकार आणि टीमचे अभिनंदन केले.



























































