पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्वोत्तम ‘हर्बल ड्रिंक्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात हवामानातील सततचे बदल आणि ओलसर वातावरणामुळे सर्दी, खोकला, घशात खवखव आणि पोटाच्या विकारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. या काळात बाहेरचे उघड्यावरील अन्न आणि स्वच्छतेचा अभाव यांचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी हर्बल ड्रिंक्स हा एक उत्तम आणि नैसर्गिक पर्याय ठरतो. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. म्हणूनच पावसाळ्यात निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी काही खास हर्बल ड्रिंक्सचा आहारात नक्की समावेश करायला हवा.

पावसाळ्यात उपयुक्त ठरणारे 5 हर्बल ड्रिंक्स

कॅमोमाईल टी :
कॅमोमाईल टी मध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. यात बॅक्टेरियाशी लढणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म असतात. याशिवाय कॅमोमाईल टी मानसिक ताण-तणाव कमी करण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत करते.

पुदिना टी :
पुदिना चहामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात जे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच पचनाच्या समस्या, मळमळ, पोटदुखी आणि पोटात येणारे गोळे कमी करण्यासाठी हा चहा गुणकारी मानला जातो.

जास्वंद चहा :
जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेल्या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करतात. सोबतच रक्तदाब आणि वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासही याची मदत होते.

आल्याचा चहा :
आल्यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील इम्युनिटी सिस्टीमला पाठबळ मिळते. याशिवाय मळमळ, अपचन आणि मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आल्याचा चहा उपयुक्त ठरतो.

हळदीचे दूध :
हळदीमध्ये ‘करक्युमिन’ नावाचा घटक असतो, ज्यामध्ये सूज कमी करणारे आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तसेच दुधातून शरीराला आवश्यक प्रथिने आणि कॅल्शियम मिळते.

पावसाळ्यात आजारांपासून वाचण्यासाठी इतर महत्त्वाच्या टिप्स

  • शरीराला निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि योग्य प्रमाणात झोप घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
  • पावसाळ्यात उघड्यावरील किंवा अस्वच्छ ठिकाणी बनवलेले अन्न खाणे टाळा.
  • फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नेहमी शुद्ध व स्वच्छ पाणीच वापरा.
  • जेवणापूर्वी आणि बाहेरून आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुण्याची सवय ठेवा.
  • तुम्हाला एखाद्या हर्बल ड्रिंकची अ‍ॅलर्जी किंवा त्रास होत असेल, तर त्याचे सेवन टाळा.