वेब न्यूज – टायटनच्या गुहांमध्ये उडणार रोबोट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< स्पायडरमॅन

शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटन हा भविष्यातील अंतराळ संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता त्याच्या पृष्ठभागावरील गुहा आणि भूमिगत प्रदेशांचा शोध घेण्यासाठी प्रोपेलर विरहित छोटे उडते रोबोट पाठवण्याची संकल्पना NASA ने पुढे आणली आहे. `SPARK’ अर्थात Solid-state Propulsion for Autonomous Reconnaissance of Karst या प्रकल्पाला NASA च्या Innovative Advanced Concepts कार्यक्रमातून 2026 मध्ये प्राथमिक संशोधनासाठी निधी मिळाला आहे. हवाई विद्यापीठातील डॅनियल ड यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पनेवर काम केले जाणार आहे. टायटनवरील गुहांमध्ये मोठी यंत्रे पोहोचवणे कठीण असल्याने हलकी, हवेत तरंगणारी छोटी वाहने ‘एरोबॉट’ म्हणून वापरण्याचा विचार आहे. या रोबोटचे सर्वात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याला पारंपरिक पंखे किंवा प्रोपेलर नसतील. त्याऐवजी इलेक्ट्रो हायड्रो डायनामिक (EHD) प्रणोदन वापरले जाणार आहे.

वातावरणातील विद्युतभाराच्या हालचालीतून निर्माण होणाऱ्या शक्तीचा उपयोग करून हे तंत्रज्ञान रोबोटला सर्व दिशांनी हलवू शकेल. यामुळे आवाज आणि खाली निर्माण होणारी हवेची हालचाल अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. पृथ्वीवर या पद्धतीने स्वतंत्र उड्डाणासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते. मात्र टायटनच्या विशिष्ट वातावरणात ऊर्जेची बचत 100 पटपेक्षा जास्त होऊ शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. सध्या SPARK हा केवळ संशोधनाचा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात टायटनसारख्या वातावरणात EHD तंत्रज्ञानाची व्यवहार्यता तपासण्यासाठी प्रयोग आणि संगणकीय नमुने तयार केले जाणार आहेत. टायटनच्या दाट वातावरणामुळे अशा हवाई मोहिमांना विशेष फायदा होऊ शकतो. NASA आधीच ‘ड्रगनफ्लाय’ या अणुऊर्जेवर चालणाऱ्या मोठ्या ड्रोनच्या माध्यमातून टायटनचा अभ्यास करण्याची तयारी करत आहे. हे यान 2028 मध्ये प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य आहे. मात्र SPARK ची कल्पना त्याहून वेगळी असून मुख्य यानातून छोटी उडती वाहने सोडून टायटनच्या अशा भागांत पोहोचवण्याचा विचार आहे, जिथे पारंपरिक यंत्रांना पोहोचणे कठीण ठरेल. त्यामुळे टायटनच्या अंधाऱ्या गुहा, खडकाळ भाग आणि भूमिगत रचनांचा जवळून अभ्यास करता येईल.