देवरुखच्या ‘रंग अवधूत’ चित्रशाळेतील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती थेट लंडनला; प्रा. अवधूत पोटफोडे यांच्या कलेला आंतरराष्ट्रीय पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवरुख येथील कला डिकॅड महाविद्यालयाचे प्राध्यापक अवधूत पोटफोडे यांच्या ‘रंग अवधूत’ या चित्रशाळेत तयार झालेली शाडूच्या मातीची गणेशमूर्ती यंदा थेट लंडनला नेण्यात आली आहे. लंडन निवासी सुनयना डोंगरे (पूर्वाश्रमीच्या मांगले) यांनी ही पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करून लंडनमध्ये गणेशोत्सवासाठी नेली आहे. यामुळे प्रा. पोटफोडे यांच्या चित्रशाळेतून गणपती बाप्पाची परदेशवारी यंदाच्या वर्षीही यशस्वीरीत्या पार पडली आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब हे मूळ गाव असलेल्या प्रा. पोटफोडे यांनी कोल्हापूर, सांगली व संभाजीनगर येथून कलेचे उच्च शिक्षण घेत मास्टर ऑफ फाईन आर्ट (MFA) ही पदवी संपादन केली. त्यानंतर देवरुख येथील कला डिकॅड महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा बजावत असताना त्यांनी कलेचा प्रसार करण्यासाठी व निसर्गाचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याचा ध्यास घेतला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण आणि विटंबना रोखण्यासाठी केवळ शाडूची माती, कागदाचा लगदा आणि पाण्यात विरघळणाऱ्या नैसर्गिक रंगांचा वापर करून मूर्ती साकारण्याचा संकल्प त्यांनी केला.

सुरुवातीला घरगुती स्वरूपात अवघ्या दोन मूर्तींपासून सुरू झालेल्या या उपक्रमाला सुबक आकार आणि उत्तम रंगरंगोटीमुळे ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. मूळ गावी पाच वर्षे काम केल्यानंतर त्यांनी देवरुख येथील पित्रे संकुलात ‘रंग अवधूत स्टुडिओ’ सुरू केला. तिथे पहिल्याच वर्षी त्यांना एक हजार मूर्तींची ऑर्डर मिळाली. आज ही चित्रशाळा वर्षभर सुरू असून ऑर्डरनुसार दरवर्षी तब्बल 10 हजार मूर्ती घडवल्या जातात. इथे 6 इंच ते 3 फूट उंचीच्या शास्त्रोक्त व सुटसुटीत मूर्ती तयार केल्या जातात, ज्यांना पुणे, मुंबईसह परदेशातून मोठी मागणी असते. दुबईतील प्रतिष्ठित गायक कौस्तुभ परांजपे यांच्यासह अनेक नागरिक दरवर्षी येथून मूर्ती नेतात. यंदा दुबई आणि दिल्लीसोबतच लंडनलाही मूर्ती पोहचली आहे.

मूर्ती निर्मितीसोबतच प्रा. पोटफोडे सामाजिक दायित्वही पार पाडत आहेत. कलासक्त तरुणांना 15 दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांनी 10 कारागिरांना वर्षभराचा रोजगार दिला आहे. तसेच महाविद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना चित्रशाळेत काम देऊन स्वावलंबी बनवले आहे. आजच्या तरुणांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारून निसर्गाचे जतन करावे, असा संदेश देणाऱ्या प्रा. पोटफोडे यांचे नाव आज कला क्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जात आहे.