
माहीम येथील प्रभाग क्रमांक 191 मधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. मात्र आपण जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक सर्व वैध कागदपत्रे दिली असून सत्ताधाऱ्यांनी राजकीय दबाव टाकल्याने आपले जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याचा गंभीर आरोप विशाखा राऊत यांनी केला आहे.
विशाखा राऊत जात वैधता प्रमाणपत्रासाठी रक्ताचे नाते सिद्ध करण्यात अयशस्वी ठरल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. मात्र समितीला रक्ताच्या नात्याचा पुरावा देणारे 1911 आणि 1920चे पुरावे दिले होते. मोडीलिपीतील हे पुरावे आपण तज्ञांकडून मराठीत भाषांतर करूनही दिले होते, मात्र समितीने सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ते नाकारले असल्याचा आरोपही विशाखा राऊत यांनी केला आहे. विशेष म्हणजे आक्षेप घेणाऱया पक्षाच्या उमेदवाराचे प्रमाणपत्रही मुंबईबाहेरचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून आपल्यावर अन्याय झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आता विशाखा राऊत यांना कोकण भवन येथील डिव्हिजिनल बेंचकडे दाद मागता येणार आहे. या ठिकाणीही न्याय न मिळाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचेही विशाखा राऊत यांनी स्पष्ट केले आहे.



























































