
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मोकळे भूखंड ढापण्याच्या सरकारच्या वृत्तीचा यावेळी निषेध करत भारतीय जनता पक्षाला रेड कार्ड दाखवले. मुंबईतील गिळलेली मैदाने सोडा, नाहीतर महापालिकेच्या चौकात येऊन बसू आणि मैदाने परत मिळत नाहीत तोपर्यंत तिथून हलणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
आदित्य ठाकरे यांनी या आंदोलनाला संबोधित करताना भूखंड हडप करत सुटलेल्या महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, 2017 मध्ये 2034 चा विकास आराखडा बनला तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एकही मैदान बिल्डर किंवा कंत्राटदाराला द्यायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाही मुंबईतील मैदाने तशीच्या तशी राहिली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी दिले होते. पण गेल्या चार वर्षांत मुंबई बदलायला लागली आहे. मागच्याच आठवडय़ात सरकारने 17 मैदानांची आरक्षणे बदलून तिथे निवासी, व्यावसायिक इमारती किंवा प्रदर्शन केंद्रे उभारण्याचा घाट घातला आहे. आरक्षणे बदलताना मैदाने व झाडे कमी होत चालली आहेत. विकास झाला पाहिजे पण खेळाची मैदानेही वाचलीच पाहिजेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आमदार-खासदारांना जाब विचारा
आदित्य ठाकरे यांनी यावेळी सर्वांना यासंदर्भात आमदार, खासदार, नगरसेवकांना अडवून जाब विचारा असेही आवाहन केले. माझी मुंबई वाचली पाहिजे, मोकळी मैदाने वाचली पाहिजेत आणि त्यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे नाहीतर तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी नाहीत, असे त्यांना ठामपणे सांगा असेही ते म्हणाले.
मुलुंड, प्रभादेवी, अंधेरी, जुहूतही आंदोलन करणार
मुंबईतील मोकळ्या भूखंडाबाबत सरकारने घेतलेले निर्णय जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाचे आभार मानले. सर्व राजकीय पक्षांना मुंबईसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन एकत्र यावेच लागेल नाहीतर हे सरकार मुंबई गिळून टाकेल, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी केले. आज सुरुवात झाली आहे. नंतर मुलुंड, प्रभादेवी, अंधेरी, जुहू अशा सगळीकडे आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. पाली हिलमध्ये न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू करण्यात आले आहे, त्याविरोधातही शिवसेना लढा देईल असेही ते म्हणाले.
‘जेन अल्फा’ने वाढवला उत्साह
‘जेन अल्फा’ पिढीचे हजारो विद्यार्थी तिरंगा हाती घेऊन प्रचंड उत्साहाने आंदोलनात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या घोषणांचे फलक त्यांच्या हातात होते. आदित्य ठाकरे यांनी या सर्वांची आर्वजून भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यावेळी हातातील फलक विद्यार्थ्यांनी त्यांना दाखवले. त्यांच्यासोबत सेल्फी घेतल्या. काही मुलांच्या पालकांनी आदित्य ठाकरे यांना निवेदनेही दिली.
मैदानासाठीच जागा असताना ती मोकळी का ठेवली नाही
नेविल डिसोझा फुटबॉल ग्राऊंड ज्या भूखंडावर आहे तो 2.58 हेक्टर म्हणजेच 6 एकरवर पसरला होता. हे सर्व मोकळे मैदान होते. मग ट्रान्झिट कॅम्प, एसआरएसाठी इथली जागा आरक्षित केली गेली. संपूर्ण मैदान मोकळे का ठेवले नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. येथील विंग्जचाही भूखंड मॅनेजमेंट व सिक्युरिटीसाठी दिला होता. तिथे एका तासाला 7 हजार रुपये द्यावे लागतात. रंगशारदालाही आज नोटीस बजावली आहे, तेसुध्दा ढापायचे चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणतात, जेन झीने स्क्रीनवर नको मैदानावर असावे, पण तुम्ही मैदाने ठेवताय कुठे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये जेन-झींशी संवाद साधला. जेन-झींनी स्क्रीनवर नको तर मैदानात असायला हवे असा सल्ला त्यांनी दिला. त्या वक्तव्याचा आदित्य ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. जेन-झींनी मैदानावर असावे असे म्हणता पण तुम्ही मैदाने ठेवताय कुठे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. सर्व मैदाने मुख्यमंत्री त्यांच्या मित्रांच्या आणि भाजप आमदारांच्या घशात घालत आहेत. मुलुंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची जागा पेट्रोल पंपासाठी द्या अशी मागणी भाजप आमदाराने केली होती. त्यासाठी समोरची पंपाची आरक्षित जागा गॅस स्टेशन करण्याचा प्रयत्न आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी त्याचे सादरीकरणही सर्वांना दाखवले.





























































