
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील आतापर्यंत 70 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. परंतु अद्याप 7 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम बाकी आहे. या कामाच्या विद्यमान कराराच्या कालावधीत फेरफार करण्यात येणार आहे. कचरा विल्हेवाटीचे काम आता 216 दिवस लांबणीवर पडणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर येणार आहे.
मुलुंड डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून याचा त्रास मुलुंडकरांसह ठाणे शहरातील नागरिकांनाही सहन करावा लागत होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर अखेर 2018मध्ये हे डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करण्यात आले. या डम्पिंग ग्राउंडवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग असून हे प्रमाण सुमारे 70 लाख मेट्रिक टन इतके होते. परंतु या सर्व कचऱयावरील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु अतिरिक्त जुना कचरा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कचरा सुमारे 7 लाख मीटर रिटन इतका असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अतिरिक्त कचऱयावर विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सध्याच्याच कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे.
कचरा विल्हेवाटीच्या कामासाठी प्रतिमेट्रिक टन 798 रुपये कंत्राटदाराला देण्यात येणार आहेत. त्यामुळे सात लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 55 कोटी 86 लाख रुपये खर्च येणार आहे. तर कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी अजून 216 दिवस लागणार आहेत.





























































