
पनवेल विधानसभा मतदारसंघातील एसआयआरचे शेकडो फॉर्म खारघरमधील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याकडे सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपचा हा पदाधिकारी या अर्जांच्या झेरॉक्स काढत असतानाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या झेरॉक्स सेंटरवर धाड टाकली. या भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी या फॉर्मसह ताब्यातही घेतले. मात्र त्यानंतर तो पळून गेल्याचे सांगत पोलिसांनी हात वर केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करा यासाठी शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.
भाजप युवा मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याकडे एसआयआरचे शेकडो फॉर्म असून तो सेक्टर 19 मधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये झेरॉक्स काढत असल्याची माहिती विभागप्रमुख बालेश भोजने यांना मिळाली. भोजने यांनी थेट झेरॉक्स सेंटर गाठले आणि या प्रकाराचा जाब विचारला. यावेळी भाजपच्या या पदाधिकाऱ्याने भोजने यांना शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्कीही केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथून फॉर्मसह निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र भोजने यांनी जोरदार प्रतिकार केल्याने त्यांना पळून जाता आले नाही. दरम्यान भोजने यांनी पोलिसांना पह्न करून ही घटना सांगताच खारघर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी झेरॉक्स काढण्यासाठी आणलेल्या एसआयआरच्या फॉर्मसह भाजपच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांनी कारमध्ये बसवून पोलीस स्टेशनमध्ये आणले. मात्र ही गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात आल्यानंतर तो भाजप पदाधिकारी पळून गेला, असे पोलिसांनी सांगितल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपनेते बबन पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, अनिल चव्हाण, रामदास पाटील, नगरसेविका लीना गरड, समाधान काशीद, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्पे, विश्वास पेटकर, नगरसेवक उत्तम मोर्बेकर आदी पदाधिकारी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल आरोपीचा तत्काळ शोध घ्या, अशी मागणी केली.
शासकीय दस्तावेज भाजप पदाधिकाऱ्यांकडे कसे?
एसआयआरचे फॉर्म हे शासकीय प्रक्रियेतील महत्त्वाचे दस्तावेज असताना ते भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडे पोहोचलेच कसे, असा सवाल बबन पाटील आणि प्रसाद भोईर यांनी केला. कोणत्या अधिकृत यंत्रणेकडून हे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले. या फॉर्मच्या अनधिकृत प्रती काढण्यास कोणी परवानगी दिली. या संपूर्ण प्रक्रियेत कोणाचे आदेश अथवा राजकीय हस्तक्षेप आहे का? असा सवाल त्यांनी केला.
राजकीय दबावाला बळी न पडता सत्य परिस्थिती समोर आणा
या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता सत्य परिस्थिती समोर आणा. बालेश भोजने यांना झालेल्या शिवीगाळ, धक्काबुक्की व धमकी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा. तसेच जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका लीना गरड व उत्तम मोर्बेकर यांनी केली. मात्र खारघर पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत होते. तुम्ही तहसीलदारांकडे पिंवा प्रांतांकडे जाऊन दाद मागा, असा सल्ला ते देत होते. यावेळी लीना गरड यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असलीच पाहिजे, शासकीय कागदपत्रांची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे. कोणत्याही राजकीय पक्षाला शासकीय कागदपत्रांचा गैरवापर करण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी ठणकावले.
नायब तहसीलदार रात्री उशिरा घटनास्थळी
पनवेलचे नायब तहसीलदार सुनील जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी कर्मचारी रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले. एसआयआर अर्ज झेरॉक्स दुकानावर नेमके कसे पोहोचले? तेथे त्यांच्या झेरॉक्स कोणाच्या सूचनेवरून काढण्यात आल्या? याबाबतचा पंचनामा सुनील जाधव यांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत सुरू होता.





























































