
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाडय़ाच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या आणि कित्येक वर्षांपासून रखडलेल्या योजनांचा लेखाजोखा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे मांडणार आहेत. ‘डेव्हलपमेंट डिलेड… डेव्हलपमेंट डिनाईड’ या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यासंदर्भात सादरीकरण करणार असून हा कार्यक्रम उद्या दुपारी 3.30 वाजता छत्रपती संभाजीनगरातील रुख्मिणी सभागृह, एमजीएम विद्यापीठ परिसर येथे होणार आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून मराठवाडय़ाच्या विकासासाठी आजवर अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र यापैकी बहुतांश घोषणा या कागदावरच राहिल्या. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने तब्बल 46 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. मात्र हे पॅकेज प्रत्यक्षात कधी मराठवाडय़ाच्या पदरी पडणार, असा प्रश्नच आहे. कारण या पॅकेजमधील किरकोळ रक्कमही अजून मराठवाडय़ाला मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर मराठवाडय़ातील प्रलंबित व रखडलेल्या विकासकामांबाबत जनतेसमोर सविस्तर सादरीकरण आणि चर्चा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना भेटणार
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे उद्या नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचीही भेट घेणार आहेत. आदित्य ठाकरे हे गुरुवारी सकाळी दहा वाजता नाशिकमध्ये येणार आहेत, असे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांनी कळविले आहे. आदिवासी विकास विभागातील भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराचा निषेध करीत 18 ऑगस्टपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आदिवासी विद्यार्थी उपोषण करीत आहेत. राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांची आदित्य ठाकरे हे भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

























































