
रत्नागिरीत आज ढाकुम्माकुम…ढाकुम्माकुम च्या तालावर थिरकत गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. जिल्ह्यात आज २ हजार ५७८ दहीहंड्या फुटल्या. त्यामध्ये २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंड्यांचा समावेश होता.
आज दुपारी रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिरातील दहीहंडी फुटल्यानंतर दहीकाला उत्सवाला प्रारंभ झाला. बाजारपेठेतील एक-एक दहीहंडी फोडत गोविंदा पथके पुढे सरकत होती. सार्वजनिक दहीहंडी पहाण्यासाठी रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती.
निष्ठावंताची दहीहंडी
रत्नागिरी शहरातील मारूतीमंदिर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने) निष्ठावंताची दहीहंडी उभारली होती. ढोलताशांच्या गजरात गोविंदा रे गोपाळाचा जयघोष करण्यात आला. लहान मुलांसाठी आयोजित वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.





























































