लडाखच्या मुद्दय़ावर वांगचुक यांचा 19 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झालेल्या लेह आणि कारगीलच्या नेत्यांच्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लडाखच्या मुद्दय़ावर सरकारकडून ठोस आश्वासन न मिळाल्यास 19 ते 24 सप्टेंबरपर्यंत पुन्हा आंदोलन करू, असा इशारा वांगचुक यांनी आज दिला.

सोनम वांगचुक म्हणाले की, 22 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर कोणतीही विशेष प्रगती झालेली नाही. केंद्रशासित प्रदेशासाठी प्रस्तावित लोकप्रतिनिधी संस्थेच्या मसुदा सरकार सादर करेल, अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. मसुद्याच्या अपेक्षेनेच कारगील डेमोक्रॅटिक अलायन्सचे प्रतिनिधी बैठकीला आले होते, मात्र त्यांचीही निराशाच झाली. बैठकीत कोणताही नवीन प्रस्ताव आला नाही आणि लडाखच्या मागण्यांवरही सरकारने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. ही बैठक लडाखचे लक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मोठय़ा लेह ते कारगील पदयात्रा मार्चपासून विचलित करण्यासाठी केवळ एक दिशाभूल करणारी बाब वाटत आहे, असा आरोप वांगचुक यांनी केला.