
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी, विशेषतः आठवड्यातून पाच दिवस कामकाज सुरू ठेवण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून चार दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे देशभरासह पुण्यातील बँकिंग कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.
शुक्रवारी पुण्यातील पुणे स्टेशन ट्रेझरी परिसरात सर्व बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने केली आणि केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. पाच दिवसांचा आठवडा लवकरात लवकर लागू करावा, या मागणीवर कर्मचारी आक्रमक झाले असून, जर मागण्या मान्य न झाल्यास आगामी 27, 28 आणि 29 तारखेला देखील देशव्यापी संप पुकारला जाईल असा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपhttps://t.co/NGG9sNVu1q pic.twitter.com/ds67ip7mfr
— Saamana Online (@SaamanaOnline) September 11, 2026
सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैशांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच बँका बंद असल्याने ग्राहकांचे चेक वटत नसून इतर महत्त्वाची आर्थिक कामेही रखडली आहेत, ज्यामुळे सामान्य नागरिक या आंदोलनात अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत.































































