मतभेदाचे रूपांतर वादात नको! नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मतभेदांचे रूपांतर वादात होता कामा नये. ते होऊ द्यायचे नसेल तर हिंदुस्थान आणि चीनने परस्परांचा सन्मान राखत, परस्परांविषयी संवेदनशीलता दाखवत एकमेकांच्या हिताची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने हिंदुस्थानात आलेले चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी मोदींनी आज स्वतंत्रपणे चर्चा केली. दोन्ही देशातील संबंधांमध्ये होत असलेल्या सुधारणेचे स्वागत करतानाच धोरणात्मक व दीर्घकालीन दृष्टिकोनातून दोन्ही देशांना काय करता येईल, यावर चर्चेत भर देण्यात आला. सांस्कृतिक देवाणघेवाण व व्यापारी संबंधांना प्रोत्साहन देण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रगती होण्यासाठी सीमेवर शांतता व स्थैर्य असणे गरजेचे आहे, असे मोदींनी स्पष्ट केले. सीमावादावर न्याय्य, विश्वासार्ह आणि दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही दोन्ही नेत्यांनी मान्य केल्याचे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

पहलगाम हल्ल्याचा निषेध

जम्मू-कश्मीरच्या पहलगामध्ये मागील वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ब्रिक्सच्या व्यासपीठावरून जोरदार निषेध करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्यांच्या विरोधात सामूहिक कारवाई करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच, ब्रिक्स परिषदेत सहभागी झालेल्या देशांचे अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरनी अमेरिकेच्या एकतर्फी टॅरिफ धोरणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.

युद्धाने कोणाचेही भले नाही! – जिनपिंग

परिषदेत बोलताना शी जिनपिंग यांनी आखाती युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. ‘या युद्धात हजारो जीव गेले आहेत. यातून कोणाचेही भले झालेले नाही. आखातात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चीन ब्रिक्स देशांसोबत आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे’, असेही जिनपिंग म्हणाले.