
राज्यात बोगस डॉक्टरांना वेळीच रोखण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ ही विशेष सिस्टिम आता बंधनकारक केली आहे. या ‘क्यूआर कोड’मुळे आता राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरला त्यांच्या दवाखान्यात, रुग्णालयात ‘क्यूआर कोड’ असलेला नामफलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा ‘क्यूआर कोड’ स्पॅन केल्यानंतर रुग्णांना संबंधित डॉक्टरची सर्व माहिती अवघ्या एका क्लिकवर कळेल.
या कार्यप्रणालीची ऑक्टोबर महिनाअखेर अंमलबजावणी केली जाणार आहे. ‘क्यूआर कोड’मुळे रुग्णांना संबंधित डॉक्टरची नोंदणी, त्यांची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय व्यवसायाची वैधता यांची अचूक माहिती मिळवणे शक्य होणार आहे. त्यामुळे बनावट डॉक्टरांवर चाप बसणार आहे. उपचारासाठी आलेला कोणताही रुग्ण आपल्या मोबाईलद्वारे हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून डॉक्टरचे नाव, नोंदणी क्रमांक, शैक्षणिक पात्रता आणि त्यांच्या परवान्याची वैधता याची माहिती मिळवू शकणार आहे. डॉक्टर एकापेक्षा जास्त ठिकाणी वैद्यकीय सेवा देत असतील, तर त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगळा ‘क्यूआर कोड’ घेणे अपेक्षित आहे. ऑक्टोबर महिनाअखेर राज्यात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दहा हजार डॉक्टरांची नोंदणी
राज्य सरकारने नोव्हेंबर 2025 मध्ये ‘केवायडी’ (नो युवर डॉक्टर) या उपक्रमाद्वारे जवळपास 10 हजार डॉक्टरांची नोंदणी पूर्ण केली आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने डॉक्टरांना http://www.kyd.co.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यावर नोंदणी केल्यानंतर डॉक्टरांना ‘क्यूआर कोड’ मिळतो. सर्व डॉक्टरांना ‘क्यूआर कोड’ असलेला नामफलक दर्शनी भागात लावावा लागणार आहे.





























































