अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई पार्श्वगायिका कृष्णा मुखर्जी यांचे मंगळवारी, 22 सप्टेंबर रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 75 होते. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर मुखर्जी कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. यशराज फिल्म्सकडून अधिकृत निवेदन जारी करून कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. तसेच या दुःखाच्या काळात कुटुंबीयांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कृष्णा मुखर्जी यांचा हिंदुस्थानी सिनेमा, विशेषतः बंगाली चित्रपटसृष्टीशी जवळचा संबंध होता. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटांसाठी गाणी गायली होती. संगीताची पार्श्वभूमी असल्याने त्यांनी मुलगी राणी मुखर्जी हिलाही लहानपणापासूनच कला आणि अभिनयाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले.

कृष्णा मुखर्जी यांनी 1980 च्या दशकात अनेक गाण्यांना आपला आवाज दिला होता. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तिसरी आंख’ या चित्रपटातील ‘ईद के दिन गले मिल ले राजा’ हे त्यांचे गाणे विशेष गाजले होते. या गाण्याला प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले होते. शास्त्रीय आणि लोकसंगीतावरही त्यांची चांगली पकड होती. राणी यांच्या अभिनयाच्या प्रवासात कृष्णा मुखर्जी यांचा कायमच महत्त्वाचा वाटा राहिला.