
>> पराग खोत
मराठी रंगभूमीवर नाटकाचा प्रयोग हा केवळ एक आकडा नसतो; तो कलाकारांच्या श्रमांचा, रंगमंचावरच्या ऊर्जेचा आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा इतिहास असतो. शंभर प्रयोग उत्सव, हजार प्रयोग विक्रम आणि पाच हजार प्रयोग मैलाचा दगड! म्हणून ‘पाच हजारी’ ही बिरुदावली आजवर मोजक्या नाटकांनाच लाभली आहे. या विक्रमांकडे पाहताना एक फरक लक्षात घ्यावा लागतो. काही नाटकांनी विविध संचांच्या माध्यमातून हा टप्पा गाठला, तर काहींचा प्रवास विशिष्ट कलाकारांच्या नावाशी जोडला गेला.
या परंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो तो ‘वस्त्रहरण’चा. गंगाराम गवाणकर लिखित आणि मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी ढंगाच्या अभिनयाने गाजलेले हे नाटक 16 फेब्रुवारी 1980 रोजी रंगभूमीवर आले. मालवणी बोलीला व्यावसायिक रंगभूमीवर स्वतंत्र ओळख मिळवून देणाऱया या नाटकाने 21 नोव्हेंबर 2009 रोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पाच हजारावा प्रयोग साजरा केला. त्यानंतर त्याचा प्रवास सुरू राहिला. आताही पुनश्च नव्या संचात हे नाटक रसिकांसमोर येण्याचा योग आहे. त्यामुळे पाच हजार हा या नाटकाचा शेवट नव्हे, तर नव्या पर्वाची सुरुवात ठरली.
‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ची विक्रमकथा वेगळी आहे. प्रा. मधुकर तोरडमल लिखित-दिग्दर्शित या नाटकाने ‘ह’च्या बाराखडीतील विनोदाचा नवा अध्याय रंगभूमीवर लिहिला. आधी मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’ आणि नंतर तोरडमल यांच्या ‘रसिकरंजन’ संस्थेने त्याचे हजारांहून अधिक प्रयोग केले. पुढे विविध नाटय़संस्थांनी ते सादर केले आणि संयुक्त प्रयोगसंख्येने 2014 मध्ये पाच हजारांचा टप्पा गाठला. त्यामुळे हा विक्रम एका संचाचा नसून नाटकाच्या दीर्घकाळ टिकून राहिलेल्या लोकप्रियतेचा सामूहिक परिणाम आहे.
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’चाही पाच हजाराच्या प्रयोगसंख्येच्या संदर्भात उल्लेख केला जातो. हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर दीर्घकाळ सादर झालेल्या या नाटकाला अनेक पिढय़ांचा प्रतिसाद मिळाला. जुन्या नाटकांच्या प्रयोगांची अधिकृत, एकसंध डिजिटल नोंद उपलब्ध नसल्याने येथे ‘पाच हजारांचा टप्पा’ अशी सावध भाषा वापरणे योग्य ठरेल. मात्र 22 ऑक्टोबर 1936 साली या नाटकाचा पहिला प्रयोग ‘बालमोहन नाटक मंडळीं’नी केला आणि आता 2026 मध्येही कुठे ना कुठे त्याचे प्रयोग सुरूच आहेत. नव्वद वर्षांच्या प्रदीर्घ काळात टिकून राहिलेले नाटक म्हणून याची निश्चितच नोंद केली जाईल.
‘तो मी नव्हेच!’ हे नाटकही या संदर्भात महत्त्वाचे ठरते. आचार्य अत्रे लिखित या नाटकाने 3000 प्रयोगांचा टप्पा पार केला होता. पुढील सादरीकरणे धरून त्याच्या एकूण प्रयोगसंख्येबाबत अधिक मोठे आकडेही संदर्भांमध्ये आढळतात. प्रभाकर पणशीकरांनंतरही अनेक दिग्गज मंडळींनी या शिवधनुष्याला हात घातला होता. मात्र त्याचा विशेष विक्रम पणशीकरांच्या अभिनयाशी निगडित आहे. त्यांनी प्रथमच एकाच नाटकात पाच विभिन्न व्यक्तिरेखा साकारल्या. त्यामुळे नाटकाच्या एकूण प्रयोगसंख्येबरोबरच कलाकाराच्या वैयक्तिक योगदानाचाही स्वतंत्र विचार करावा लागतो.
देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’चे मराठीतील 4500 प्रयोग झाले असून विविध भाषांतील आवृत्त्यांसह त्याची प्रयोग संख्या जवळपास दहा हजारांवर गेल्याचे पेम यांनी नमूद केले आहे. त्यामुळे मराठीतील आणि सर्व भाषांतील प्रयोगांची स्वतंत्र गणना करणे आवश्यक ठरते. या नाटकाचा इतिहास तितकाच रंजक आहे. 31 डिसेंबर 1993 रोजी व्यावसायिक रंगभूमीवर पहिला प्रयोग झाला. सुरुवातीच्या काळात चंद्रलेखा या नावाजलेल्या नाटय़संस्थेने एकाच वेळी तीन संचात प्रयोग करण्याचा पराक्रम केल्याने, नाटकाचे महिन्याला 60 ते 70 प्रयोग होत. पहिल्या पाच वर्षांत तब्बल 2100 प्रयोग झाल्याची नोंद आहे. पुढे नाटकाने विविध भाषांमध्येही प्रवास केला. मराठी रंगभूमीवरील इतका प्रदीर्घ आणि सातत्यपूर्ण प्रवास व्यावसायिक नाटकांच्या इतिहासात लक्षणीय ठरतो.
अलीकडच्या काळात ‘सही रे सही’ याचाही या विक्रम परंपरेत उल्लेख होतो. भरत जाधव यांच्या बहुरंगी अभिनयाने लोकप्रिय झालेल्या ‘सही रे सही’ने 4500 प्रयोगांचा टप्पा गाठल्याची नोंद आहे. पुढे हिंदीत शर्मन जोशी याने हा पराक्रम अधिक पुढे नेला. मात्र इतर काही नाटकांप्रमाणे विविध संचात किंवा वेगवेगळ्या नटांनी केलेल्या संयुक्तिक प्रयोगांपेक्षा भरत जाधव यांनी एकटय़ाच्या जोरावर ‘सही रे सही’ या नाटकाचे सगळे प्रयोग केले आणि ते अजूनही सुरू आहेत आणि हा एक अनोखा विक्रम आहे.
प्रशांत दामले यांच्या कारकीर्दीत वेगळ्या प्रकारचा विक्रम दिसतो. त्यांच्या विविध नाटकांतील एकत्रित प्रयोगसंख्या आता तेरा हजारांच्या पुढे गेली आहे. हा एका नाटकाचा विक्रम नसला तरी एका कलाकाराने रंगभूमीला दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानाचा महत्त्वपूर्ण दाखला आहे.
‘पाच हजार’ हा आकडा नेमका कुणाच्या नावावर नोंदवायचा, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. नाटककार, निर्माता, पहिला संच, नंतर ते पुढे नेणाऱया संस्था आणि कलाकार या सर्वांचा त्या यशात वाटा असतो. पूर्वी प्रयोगांची नोंद वह्या, संस्थेची कागदपत्रे किंवा वर्तमानपत्रांमध्ये विखुरलेली असे. आज डिजिटल साधने उपलब्ध असली तरी जुन्या आकडय़ांची पडताळणी करताना संदर्भ तपासणे गरजेचे आहे. याच कारणामुळे ‘वस्त्रहरण’चा 5555 वा प्रयोग, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’चा संयुक्त पाच हजारावा प्रयोग आणि ‘सही रे सही’चा साडेचार हजारांपुढील प्रवास यांची तुलना एकाच निकषाने करता येत नाही. कुणी बोलीभाषेच्या सामर्थ्याने प्रेक्षक जिंकले, कुणी विनोदातून पिढय़ा जोडल्या, कुणी बहुरूपी अभिनयाने रंगभूमी गाजवली, तर कुणी नव्या कलाकारांना संधी देत नाटकाचा प्रवास सुरू ठेवला.
पाच हजारांचा टप्पा गाठण्यासाठी कथा टिकाऊ असावी लागते, संवाद स्मरणात राहावे लागतात आणि कलाकार बदलले तरी नाटकाचा आत्मा जिवंत राहावा लागतो. काळ, विनोदाची भाषा आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलत असतानाही काही नाटके रसिकांना पुन्हा पुनः रंगमंचाकडे खेचतात. म्हणून ‘पाच हजारी मनसबदार’ ही पदवी केवळ प्रयोगसंख्येची नोंद नाही; ती मराठी रसिकांच्या आयुष्यभर टिकलेल्या प्रेमाची पावती आहे. पडदा प्रत्येक वेळी नव्याने उघडतो आणि पाच हजार प्रयोगांनंतरही नाटक तितकेच ताजे वाटते हाच त्याचा खरा विक्रम!































































