
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे संबंध अधोरेखित करणारी सबीर भाटिया यांची ‘द फ्रेंडशिप फाईल्स’ ही डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या व्हिडीओला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. परंतु, मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीमुळे राज ठाकरे यांनी ती डॉक्युमेंट्री आपल्या सोशल मीडिया खात्यावरून (अकाउंटवरून) डिलीट केली. “आयुक्तांच्या विनंतीचा मान राखतोय, पण जी आग लागायची ती लागली आहे,” असे सांगत, “डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय, तरी राज्यातील आमदार-खासदार गप्प का?” असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांनी यासंदर्भात आज सोशल मीडियावर पोस्ट केली. “नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांची मैत्री किती जुनी आहे आणि यातून देशातील उद्योगविश्व कसे अदानींच्या घशात घातले जात आहे, हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा आमचा हेतू साध्य झाला. भाटिया यांनी ही डॉक्युमेंट्री आता बनवली असली, तरी अदानी समूह देश कसा गिळंकृत करत आहे, हे जानेवारी २०२६ मध्येच आम्ही शिवतीर्थावरील सादरीकरणातून दाखवून दिले होते. ते व्हिडीओज आजही आमच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. त्यातील काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीतही वापरल्या गेल्या आहेत,” असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
एकाधिकारशाहीविरोधात लढा कायम राहील
“डॉक्युमेंट्री हटवली असली, तरी देशाच्या प्रबोधनासाठी लावलेली ठिणगी आता वणवा बनली असून, एकाधिकारशाहीविरोधातील लढा यापुढेही कायम राहील,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.























































