इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाला चालना, बजाज ऑटोला 66 कोटींचा विशेष निधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र इलेक्ट्रिक धोरण-2021 च्या अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेडला विशेष बाब म्हणून 66 कोटी 82 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्य शासनाच्या इलेक्ट्रिक धोरणांर्गत नोंदणी होणाऱया नवीन इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन जाहीर करण्यात आले आहे. हा प्रोत्साहन निधी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांद्वारे वाहन खरेदीदारांना वाहन विक्रीच्या वेळी देण्यात येतो.

जिल्हा परिषदांमध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आता सहायक प्रशासन अधिकारी असे एकच पद राहणार. लिपिकवर्गीय गट-क संवर्गातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक प्रशासन अधिकारी हे दोन संवर्ग एकत्रित करण्यात येणार. त्यामुळे सहाय्यक प्रशासन अधिकारी असा एकच संवर्ग राहणार.

पीपीपी धोरणात सुधारणा

महाराष्ट्र सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण (पीपीपी)मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी. प्रकल्पांची छाननी, तत्त्वतः मान्यता, प्रस्तावासाठी विनंती, व्यवहार संरचना, निविदा प्रक्रिया व बोली या टप्प्यांचे सुनियोजन होणार. या सुधारणांमुळे सार्वजनिक-खासगी भागीदारी प्रकल्पांच्या मंजुरी प्रक्रियेचे सुलभीकरण करण्याच्या दृष्टीने पाऊल आहे.

पाणंद रस्ते खर्चात वाढ

राज्यातील शेत-पाणंद रस्त्यांची कामे अधिक प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी तसेच मनरेगा आणि राज्य रोजगार हमी योजनेच्या अभिसरणातून उपलब्ध निधी चांगल्या रीतीने वापरण्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेतील खर्चाच्या अनुदानाची मर्यादांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय.

लोहगावला भारत मंडपमच्या धर्तीवर प्रदर्शन केंद्र

पुणे महापालिकेच्या हद्दीतील लोहगाव येथे भारत मंडपमच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन पेंद्र उभारण्यासाठी संबंधित जमिनीवरील आरक्षण बदलास बैठकीत मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारच्या भारत मंडपम सांस्कृतिक केंद्राच्या धर्तीवर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेत भारत मंडपम केंद्रासाठी किमान 30 एकर जमीन आरक्षित करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने लोहगाव येथील जमिनीची निवड केली आहे.

जलसंपदासाठी 40 हजार पदांचा आकृतिबंध मंजूर

जलसंपदा विभागासाठी वाढीव 110 सिंचन शाखांसह 39 हजार 722 पदांच्या आकृतिबंधास मंजुरी देण्यात आली. नदीजोड प्रकल्पासाठी मुख्य अभियंता, कृषी, कार्यकारी अभियंता दर्जाची पदे, सिंचन सहाय्यक असे नवीन पद निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यात 2016 अखेरपर्यंत सिंचनाखाली असलेल्या 45 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये 13 लाख हेक्टरची वाढ झाली आहे. त्यामुळे 2025 अखेरपर्यंत 58 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या वाढीव क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरिता 110 सिंचन शाखांसह एकूण 1 हजार 450 सिंचन शाखा कार्यालयासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली.