
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱयांना 33 हजार रुपयांचा दिवाळी बोनस शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या बोनसची रक्कम आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार एकाच दिवशी 3 नोव्हेंबरला कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बेस्ट उपक्रमातील 22,654 अधिकारी आणि कर्मचाऱयांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेने 33 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य झाल्याने कर्मचाऱयांची दिवाळी गोड झाली आहे.
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त प्रत्येकी 33 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱयांना दोन दिवसांपूर्वी बोनस जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणेच बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनसची खूशखबर शुक्रवारी मिळाली. गेल्या वर्षी देण्यात आलेल्या सानुग्रह अनुदानाच्या तुलनेत यंदा दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा अधिक आर्थिक दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे बेस्ट उपक्रमावर सुमारे 75 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. बोनससाठी विशेष तरतूद करून कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित केला जात असल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर, भाजपचे सुनील गणाचार्य उपस्थित होते. बेस्ट कामगार सेनेची मागणी मान्य झाल्याबद्दल नांदगावकर यांनी समाधान व्यक्त केले.
शिंदे गट-भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी
बेस्ट कर्मचाऱयांच्या बोनसची घोषणा बेस्ट समिती अध्यक्षांद्वारे केली जाते. मात्र शिंदे गटाच्या समिती अध्यक्ष विश्वासराव यांनी घोषणा करण्याआधीच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट भवनमध्ये हजेरी लावली आणि तेथे बोनस 3 नोव्हेंबरला दिला जाणार असल्याचे जाहीर केले. यातून शिंदे गट व भाजपमधील अंतर्गत पुरघोडी चव्हाटय़ावर आली. लाड यांनी ‘प्रोटोकॉल’ मोडल्याने विश्वासराव प्रचंड दुखावल्या. मात्र त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य टाळले.
कंत्राटी कामगारांनाही बोनस देण्याचे निर्देश
बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱयांप्रमाणेच वेटलीजच्या कंत्राटी कामगारांनाही बोनस मिळेल, असे समिती अध्यक्ष विश्वासराव यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात संबंधित कंत्राटदारांशी चर्चा केली असून कंत्राटी कामगारांनाही योग्य बोनस रक्कम देण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. उपक्रमाच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांनाही बोनसची प्रतीक्षा लागली आहे.



























































