
स्वयंपाकघरात प्रेशर कुकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. डाळ, भात, भाज्या आणि इतर पदार्थ लवकर शिजवण्यासाठी कुकर उपयुक्त ठरतो. मात्र, अनेकदा कुकरमधून सतत वाफ बाहेर येणे किंवा शिट्टीसोबत पाणी बाहेर उडणे अशा समस्या निर्माण होतात. यामुळे गॅस शेगडीवर घाण पसरते आणि स्वयंपाकातही अडथळा येतो. कुकरमधून वाफ बाहेर येण्यामागे रबर खराब होणे, शिट्टीमध्ये अन्नाचे कण अडकणे, झाकण व्यवस्थित बंद न होणे किंवा कुकरमध्ये जास्त पाणी भरणे अशी कारणे असू शकतात.
प्रेशर कुकरच्या झाकणाला असलेली रबर सील आत तयार होणारा दाब टिकवून ठेवण्याचे काम करते. दीर्घकाळ वापरामुळे रबर सैल, कडक किंवा खराब होऊ शकते. अशावेळी झाकण व्यवस्थित बंद होत नाही आणि बाजूने वाफ बाहेर पडू लागते. त्यामुळे कुकरमधून सतत वाफ बाहेर येत असल्यास सर्वप्रथम रबरची स्थिती तपासा. रबर खराब झाले असल्यास ते बदलणे आवश्यक आहे. वापरानंतर रबर स्वच्छ करून कोरडे ठेवावे.
कुकरच्या शिट्टीमध्ये डाळ, तांदूळ किंवा अन्नाचे छोटे कण अडकले तर वाफ बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कुकरमध्ये योग्य दाब तयार होण्यात समस्या येऊ शकते.
कुकर थंड झाल्यानंतर आणि त्यातील दाब पूर्णपणे निघून गेल्यानंतर शिट्टी आणि व्हेंटची स्वच्छता करावी. त्यामध्ये अन्नाचे कण अडकलेले नाहीत ना, हे तपासावे.
कधी कधी कुकरमध्ये कोणताही बिघाड नसतो, तर झाकण योग्य पद्धतीने लावलेले नसते. झाकण एका बाजूने उघडे राहिल्यास वाफ बाहेर पडू शकते. त्यामुळे कुकर गॅसवर ठेवण्यापूर्वी झाकण व्यवस्थित लॉक झाले आहे की नाही, हे तपासावे.
डाळ, भात किंवा भाज्या शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी टाकल्यास उकळीबरोबर पाणी शिट्टीच्या दिशेने जाऊ शकते. त्यामुळे पाणी आणि वाफ बाहेर पडण्याची समस्या निर्माण होते. प्रत्येक पदार्थासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरावे. कुकर क्षमतेपेक्षा जास्त भरू नये. त्यावरील कमाल भरण्याच्या मर्यादेचे पालन करावे.



























































