वेब न्यूज – लहान बॅटरी, जास्त पल्ला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>स्पायडरमॅन<<

इलेक्ट्रिक मोटार घेण्याचा विचार करताना सर्वसामान्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो तो बॅटरीच्या पल्ल्याचा. एकदा चार्ज केल्यानंतर मोटार किती किलोमीटर जाईल आणि त्यासाठी किती मोठी व जड बॅटरी लागेल, हे महत्त्वाचे ठरते. दक्षिण कोरियातील ‘कोरिया ऍडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ अर्थात ‘काइस्ट’मधील संशोधकांनी या समस्येवर काम करताना नव्या प्रकारच्या बॅटरीसाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या संशोधनामुळे भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आकाराने लहान व वजनाने हलक्या ठेवूनही अधिक ऊर्जा साठवणे शक्य होऊ शकते. सध्याच्या अनेक लिथियम-आयन बॅटऱ्यांमध्ये लिथियम साठवण्यासाठी ग्रॅफाईटसारख्या पदार्थाचा वापर केला जातो. मात्र ‘ऍनोड-फ्री’ म्हणजेच स्वतंत्र ऍनोड नसलेल्या नव्या प्रकारच्या बॅटरीत ही रचना बदलते. अशा बॅटरीत लिथियम एका पातळ तांब्याच्या पत्र्यावर साठवले जाते. त्यामुळे बॅटरीतील काही पदार्थांची गरज कमी होऊन तिचे वजन आणि जाडी कमी करण्याची शक्यता असते. त्याच जागेत अधिक ऊर्जा साठवण्यासही मदत होऊ शकते. मात्र या तंत्रज्ञानासमोर मोठी अडचण होती. बॅटरी चार्ज करताना लिथियम तांब्याच्या पृष्ठभागावर समान प्रमाणात साचत नाही. काही ठिकाणी ते टोकदार, सुईसारख्या रचनेत वाढू शकते. त्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता आणि आयुष्य कमी होण्याचा धोका निर्माण होतो. या समस्येवर उपाय म्हणून संशोधकांनी संगणकाच्या चिप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्यंत अचूक तंत्रज्ञानाचा आधार घेतला. त्यांनी तांब्याच्या पृष्ठभागावर अतिसूक्ष्म नळीसारख्या रचना तयार केल्या. त्यामुळे लिथियमला एका जागी जास्त प्रमाणात साचण्याऐवजी अधिक समान पद्धतीने पसरायला मदत होते. त्याचबरोबर पृष्ठभागावर अत्यंत पातळ संरक्षक थर तयार करण्यासाठी ‘एमएक्सिन’ या पदार्थाचा वापर करण्यात आला. या दोन्ही उपायांमुळे बॅटरीतील लिथियमची हानीकारक वाढ कमी करून तिचे आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे संशोधन अद्याप प्रत्यक्ष बाजारातील इलेक्ट्रिक मोटारींमध्ये वापरलेले नाही. तरीही भविष्यात ऍनोड-फ्री बॅटऱ्या व्यावसायिक वापरासाठी यशस्वी ठरल्या तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी ही महत्त्वाची झेप ठरू शकते.