
पालघर जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून वितरित करण्यात येणाऱ्या धान्याच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी शासनाकडून ‘मिशन सुधार’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत उत्पन्न मर्यादेच्या निकषानुसार जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८० शिधापत्रिकाधारकांचे धान्य बंद केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ हजार ७६९ शिधापत्रिकांचे धान्य वितरण बंद करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनांतर्गत एकूण १७ लाख ८२ हजार ८२० लाभार्थी आहेत. शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार जिल्ह्यातील १ लाख १८० शिधापत्रिकाधारकांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबरपर्यंत १५ हजार ७६९ लाभार्थ्यांचे धान्य वितरण प्रत्यक्षात बंद करण्यात आले असून पुढच्या टप्प्यात उर्वरित ८४ हजार ४११ शिधापत्रिकांवरील लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
सर्वाधिक रेशनकार्ड वसईत
वसई तालुक्यात सर्वाधिक १४ हजार १५३ शिधापत्रिकांवरील धान्य वितरण बंद करण्यात आले त्यापैकी ५८ हजार १७३ शिधापत्रिकाधारकांवर कारवाई अद्याप प्रलंबित आहे. या तालुक्यात सुधार यादीनुसार ७२ हजार ३२६ शिधापत्रिकाधारकांची यादी प्राप्त झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक कारवाई वसई तालुक्यात झाली आहे.
लाभार्थ्यांनी जेव्हा शिधापत्रिका तयार केली तेव्हा ते पात्र लाभार्थी मध्ये होते. आता ज्यांचे उत्पन्न वाढले आहे त्यांनी स्वतःहून रेशन योजनेतून बाहेर पडले पाहिजे. अन्यथा आयकर विभागातून जी माहिती येईल त्यानुसार त्यांचे धान्य बंद करण्यात येईल – सीमा मल्ले, जिल्हा पुरवठा अधिकारी.





























































