फिरस्ती : लढाऊ वृत्तीचा भुईकोट – वनदुर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रांजल वाघ, [email protected]

कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सुरपूर नायकांनी एक भुईकोट बांधला. पूर्वी दाट अरण्याने वेढलेला या दुर्गाचे नाव ‘वनदुर्ग!’ हा दुर्ग स्थापत्यशास्त्राचा एक अद्वितीय आणि थक्क करणारा नमुना आहे. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरपूर (शोरापूर) घराण्याचे पराक्रमी राजे कृष्णप्पा नायक यांनी या किल्ल्याची उभारणी केली. तसा देवनागरी शिलालेख किल्ल्यात कोरलेला आहे. ज्या काळात हा किल्ला बांधला गेला, त्याकाळी तो चारही बाजूंनी घनदाट आणि भयाण अरण्याने वेढलेला होता. काळानुसार आजूबाजूचे जंगल नष्ट होऊन तेथे शेती फुलली असली तरी या किल्ल्याच्या भक्कम तटबंदीत दख्खनचा तेजस्वी इतिहास आजही तितकाच जिवंत आहे.

वनदुर्गच्या स्थापत्यशास्त्राचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे याच्या सभोवताली असलेला साधारण 30 फूट रुंद आणि 12 फूट खोल विशाल खंदक. दख्खनच्या भीषण उन्हाळ्यात जेव्हा परिसरातील विहिरी आणि नद्या सुकून जातात, तेव्हाही या खंदकातील पाणी कधीही आटत नाही. हे येथील प्राचीन जलव्यवस्थापन आणि भूगर्भीय अभियांत्रिकी कौशल्याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.

किल्ल्याची रचना शत्रूला चक्रव्यूहात अडकवण्यासाठी ‘दुहेरी तटबंदी’ पद्धतीवर करण्यात आली आहे. महाद्वाराच्या बुरुजावरील मारुतीरायाचे शिल्प आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर शत्रू एका मोठय़ा मोकळ्या चौकात अडकवला जाई, जिथे तटबंदीवरून सैनिकांचा थेट मारा होत असे. पहिल्या सुरक्षा चौकटीतून मार्ग काढल्यानंतरच मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करता येत असे. तटबंदीमध्ये अनेक खोल्या आहेत आणि हत्तींना बांधण्यासाठी छिद्र पाडलेले विशाल दगडी खांब आजही सुस्थितीत पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या सर्वात सुरक्षित भागात म्हणजेच बालेकिल्ल्याच्या मध्यभागी श्री हनुमान मंदिर स्थित आहे. मंदिराच्या अगदी जवळच एक खोल प्राचीन विहीर आहे. यामुळे प्रदीर्घ वेढा पडला तरी सैनिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत असे. आज किल्ल्याचे इतर भाग काळाच्या ओघात अवशेष रूपात असले तरी हे मारुती मंदिर आजही स्थानिक ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

वनदुर्ग आणि सुरपूर राज्याचा इतिहास मराठा साम्राज्याशी अत्यंत घट्ट जोडलेला आहे. मुघल-मराठा संघर्षाच्या काळात विशेषत 1705 मध्ये वागीनगेराच्या वेढय़ादरम्यान मराठा सेनापती धनाजी जाधव आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या सैन्याने सुरपूरच्या बेडर नायकांना मोलाची मदत केली. मराठा घोडदळाने मुघल छावणीवर अचानक छापे मारून रसद तोडली, ज्यामुळे मुघल सम्राट औरंगजेबाचे सैन्य बेजार झाले होते. 18 व्या शतकात पेशव्यांच्या काळात सुरपूर संस्थान मराठय़ांचे प्रादेशिक वर्चस्व मान्य करत असे आणि नियमाने ‘चौथाई’ (महसुलाचा 25 टक्के भाग) पुणे दरबारी भरत असे.

1857 च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात सुरपूरचे शेवटचे तरुण राजे व्यंकटप्पा नायक चतुर्थ यांनी मराठा क्रांतिकारकांच्या हाकेला साद देत ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. नानासाहेब पेशवे आणि दख्खनमधील मराठा सरदारांशी त्यांचा थेट संपर्क होता.

गुप्त भुयारे, हत्ती बांधण्याचे दगडी खांब आणि सदाहरित खंदकासह उभा असलेला वनदुर्ग हा केवळ दगड-मातीचा सांगाडा नसून मराठा-बेडर युती, अद्वितीय जलव्यवस्थापन आणि ब्रिटिशविरोधी संघर्षाचा एक जिवंत दस्तऐवज आहे. आज हा किल्ला पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असून दख्खनच्या लष्करी इतिहासात रस असणाऱया प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावे असे हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे.