
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असून, एसटी प्रशासनासह स्वच्छतेचे काम पाहाणाऱ्या ठेकेदार कंपनीकडूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
बसस्थानकात प्रवाशांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. पाण्याअभावी नियमित साफसफाई करणे शक्य होत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. त्यातच स्वच्छतागृहांमधील अनेक दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्याने नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे बाहेर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून बादलीने पाणी घेऊन स्वच्छतागृहात जावे लागत आहे. महिला प्रवाशांसह वृध्दांनाही या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी क्रिस्टल या ठेकेदार कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. आगार परिसरासह स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी एसटी प्रशासनाकडून प्रत्येक प्रवासी तिकिटामागे दोन रुपये स्वच्छता अधिभारही आकारला जातो. असे असतानाही मूलभूत सुविधांची दुरवस्था कायम असल्याने या शुल्काचा उपयोग नेमका कशासाठी केला जात आहे, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. या समस्येबाबत आगार व्यवस्थापक तसेच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, लवकरच व्यवस्था करण्यात येईल आणि प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.
ऐन गर्दीच्या हंगामात पाण्यामुळे बोंब
सध्या दिवाळी सणानिमित्त कोकणातील चाकरमानी आणि अन्य प्रवासी गावाकडे येत असल्याने बसस्थानकातील गर्दी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत स्वच्छतागृहांमध्ये पाणी आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. स्वच्छता शुल्क आकारले जात असताना साध्या स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रशासनाला करता येत नसेल, तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या जबाबदारीचे काय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. प्रवाशांच्या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने एसटी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.































































