
दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी डोंगर परिसरात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग, चप्पल, विळा, गवताच्या पेंड्या आणि कपडे आढळून आले आहेत. मात्र, शेतकऱ्याचे शरीर अद्याप सापडलेले नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
देविदासराव टकले (वय 46) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते आष्टी तालुक्यातील देवळाली येथील रहिवासी होते. जनावरांसाठी चारा आणण्याच्या उद्देशाने ते सोनीपठार परिसरातील डोंगरावर गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध सुरू केला.
शोधादरम्यान देवळाली-लोखंडवाडी परिसरातील सोनीपठार डोंगरावर काही संशयास्पद खुणा आढळून आल्या. घटनास्थळी रक्ताचे डाग, टकले यांची चप्पल, विळा, गवताच्या पेंड्या आणि कपडे आढळले. मात्र, त्यांचे शरीर घटनास्थळी दिसून आले नाही.
ऐन दिवाळीच्या सणात टकले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांची उपासमार टाळण्यासाठी चारा आणायला गेलेल्या शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याच्या शक्यतेने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी या घटनेत वाघाचाच हल्ला झाल्याचे सांगितले आहे. तसेच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी जंगलालगतच्या भागात वावरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या वावराचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.































































