
इचलकरंजीतील पौरोहित्य करणारे मंदार अजित रानडे (वय 38) यांचा कर्नाटक राज्यातील मानकापूर येथे झालेल्या खुनाच्या घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. मुलीचे दुसऱया जातीच्या मुलाशी प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह लावून दिल्याच्या रागातून मुलीच्या बापानेच रानडे यांचा डोळय़ांत मिरचीपूड टाकून विळय़ाने वार करून खून केल्याचे सदलगा (कर्नाटक) पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. दरम्यान, ‘अशाच प्रकारचे अजून एक लग्न जमावायचे आहे,’ असे सांगून आरोपीने मंदार रानडे यांना कर्नाटकमधील मानकापूर येथे बोलावून घेतले होते.
भाऊसाहेब अण्णा मगदूम (वय 46, रा. शिरदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या मुलीच्या बापाचे नाव आहे. त्याने गुह्याची कबुली दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आरोपी भाऊसाहेब हा आचारी आहे. त्याच्या मुलीचे गावातीलच अन्य जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. हे लग्न लावून देण्याचे काम मंदार रानडे यांनी केले होते. याचा राग आरोपी भाऊसाहेब मगदूम याला होता. दरम्यान, ‘असाच आणखी एक आंतरजातीय विवाह लावून द्यायचा आहे,’ असे सांगत आरोपी भाऊसाहेब याने रानडे यांना 31 ऑक्टोबर 2026 रोजी इचलकरंजीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकमधील मानकापूर (ता. निपाणी) गावात बोलावून घेतले. दुपारी मंदार रानडे यांना शीतला तेरदाळे यांच्या शेतात नेऊन त्यांच्या डोळय़ांत मिरचीपूड टाकून धारदार विळय़ाने मानेवर वार करून खून केला. याप्रकरणी कर्नाटकमधील सदलगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदलगा पोलिसांच्या विशेष पथकाने तपास करून आरोपी भाऊसाहेब मगदूम याला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून धारदार शस्त्र्ा आणि दुचाकी जप्त केली आहे. दरम्यान, आरोपी भाऊसाहेब मगदूम याने गुह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
इचलकरंजीतील पंचगंगा नदीच्या दक्षिण बाजूला शिरोळमधील शिरदवाड आणि कर्नाटकातील मानकापूर ही गावे आहेत. मंदार रानडे यांच्या खुनाच्या उलगडय़ानंतर जातीच्या भिंती अजूनही ग्रामीण भागात घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सदलगा (कर्नाटक) पोलिसांनी मंदार रानडे यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवण्याचे काम पूर्ण केले आहे.
































































