
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये पुन्हा वाद झाला, त्यांच्यातील मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात महिला सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
सध्या दिवाळीच्या सुट्टय़ांमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात देशभरातून मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत. गाभाऱयासमोर भाविक जास्त वेळ थांबल्यास इतरांना दर्शन घेता येत नाही, त्यामुळे सुरक्षारक्षकांना नाईलाजास्तव त्यांना बाजूला करावे लागते, असे देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. आठ-आठ तास रांगेत उभे राहूनही नीटसे दर्शन घेवू दिले जात नसल्याचा आरोप भाविकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. दरम्यान, बुधवारी व्हायरल झालेले मंदिर प्रांगणातील भाविक-सुरक्षारक्षकांमधील वादाचे व मारहाणीचे व्हिडीओ नक्की कधीचे आहेत, याचा तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहेत. भाविकांकडून याबाबत कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या कर्मचारी सावित्री गावीत यांनी आपल्याला अज्ञात महिला भाविकाने शिवीगाळ केल्याची, तर दुसऱया कर्मचारी वैष्णवी सूर्यवंशी यांना शिवीगाळ-मारहाण करण्यात आल्याची फिर्याद बुधवारी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.































































