
हिंदुस्थानच्या विवान कपूरला गुरुवारी आयएसएसएफ जागतिक चॅम्पियनशिपमधील पुरुषांच्या ट्रप प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या कामगिरीमुळे हिंदुस्थानला लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी कोटाही मिळाला आहे.
विवानचे सुवर्णपदक कसे हुकले
24 वर्षीय जयपूरचा नेमबाज विवान उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि पुरुषांच्या ट्रप प्रकारातील जागतिक विजेतेपद जिंकणारा दुसरा हिंदुस्थानी ठरेल असे वाटत होते. पण शूट-ऑफमध्ये विवानने क्ले बर्ड चुकवल्यामुळे कुवेतच्या अब्दुल रहमान अल्फाइहानला सुवर्णपदक मिळाले. अंतिम फेरीत दोन्ही नेमबाजांनी 30 पैकी 29 गुण मिळवले, ज्यामुळे विजेता ठरवण्यासाठी शूट-ऑफची मदत घेण्यात आली.
पदक जिंकणारा चौथा हिंदुस्थानी
या रौप्यपदकासह विवान अत्यंत स्पर्धात्मक पुरुषांच्या ट्रप प्रकारात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा चौथा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी दिग्गज नेमबाज कर्णी सिंग (रौप्य), मानवजीत सिंग संधू आणि झोरावर सिंग संधू यांनी हे पदक जिंकले होते. विवान लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिकसाठी कोटा स्थान मिळवणारा तिसरा हिंदुस्थानचा नेमबाजदेखील ठरला आहे. यापूर्वी, जयपाल मालवीय आणि नीरज कुमार यांनी हिंदुस्थानसाठी ऑलिम्पिक कोटा मिळवला आहे.



























































