
हिंदुस्थानला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर संघाबाहेर केलेल्या सूर्यकुमार यादवने आपली पॉवर पुन्हा एकदा दाखवून दिली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक झळकवले आणि आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली. सूर्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईने हा सामना सात विकेट्स राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने 13.1 षटकांत तीन फलंदाज गमावून 174 धावा करत सामना जिंकला.
हैदराबादच्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अंगक्रिष सूर्यवंशी (27) आणि हार्दिक तामोरे (22) यांनी चांगली सुरुवात केली, पण सूर्या फलंदाजीला आला आणि मैदानात वादळ घोंगावलं. सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने 21 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 60 धावा केल्या. सूर्यकुमारने 15 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने मुशीर खानसोबत 23 चेंडूंमध्ये 65 धावांची भागीदारी केली. मुशीरनेही अर्धशतक झळकावले. बाद होण्यापूर्वी मुशीरने 24 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांसह 51 धावा केल्या. मुशीर बाद झाल्यावर फलंदाजीला असलेल्या शिवम दुबेने 14 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून मुंबईला विजय मिळवून दिला. शिवम दोन षटकारांसह पाच चेंडूंमध्ये 13 धावांवर नाबाद राहिला.




























































