
अंधेरीच्या विधी महाविद्यालयाने एका विद्यार्थिनीच्या पर्सेंटाईलसह आवश्यक कागदपत्रे सीईटी सेलकडे पाठवली नसल्याने या विद्यार्थिनीवर वर्ष वाया जाण्याची वेळ आली आहे. याची दखल घेत युवासेनेने आज सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन संबंधित विद्यार्थिनीचा प्रवेश नियमित करून हलगर्जीपणा करणाऱ्या कॉलेजवर कारवाई करावी, अशी मागणी केली.
जे.बी. नगर येथील राजस्थानी सेवा संघाच्या विधी महाविद्यालयामध्ये चैताली महाडिक हिला प्रवेश दिला. त्यानुसार चैताली हिने (सीईटी परीक्षेत 93 टक्के पर्सेंटाइल) 22 ऑगस्ट रोजी 13 हजार रुपये शुल्क भरले; परंतु महाविद्यालय प्रशासनाने सदर विद्यार्थिनीची शैक्षणिक कागदपत्रे पुढील प्रक्रियेसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे पाठवलीच नाहीत. त्यामुळे तिची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी सीईटी सेल सचिवांची भेट घेत महाविद्यालयावर दंडात्मक कारवाईची मागणी युवासेनेने केली. यावेळी सचिव सरदेसाई यांनी, विद्यार्थिनीचा प्रवेश नियमित करणे शक्य नाही; परंतु महाविद्यालयावर मोठी दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.




























































