
नाथ संप्रदायाचा महाराष्ट्रावर आणि मराठी संत साहित्यावर मोठा प्रभाव दिसून येतो. नाथ संप्रदायातील पुरुषांना योगी, तर स्त्रियांना नाथ योगिनी असे महत्त्व दिले जाते. शिवाबरोबर शक्तीचीही उपासना या पंथात केली जाते. अशा नाथ संप्रदायातील एक प्रमुख योगिनी म्हणजे संत विमलादेवी. मच्छिंद्रनाथ कौल योगिनी संप्रदायाचेही प्रवर्तक मानले जातात. नाथपंथीयांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही योगसाधनेची दिक्षा दिली. अनेक स्त्रिया नाथ संप्रदायात आढळतात. त्यातील विद्वान अशा संत विमला देवी, ज्या गोरक्षनाथांच्या शिष्या होत्या. नयनावती, आउसा, मुक्ताबाई या सगळ्या नाथ योगिनी होत्या. विमलादेवी या गोरक्षनाथांच्या प्रत्यक्ष शिष्या होत्या. नाथ संप्रदायातील बारा उपपंथापैकी ‘आई पंथा’च्या त्या प्रवर्तक समजल्या जातात. गोरक्षनाथ भ्रमंती करताना त्यांच्यापाठी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम विमलादेवी करत असत. त्रिदेवांचा अंश असलेली गोरक्षनाथांची साधना विमलादेवींनी आचरणात आणत त्याच मार्गाने लोकसेवा केली.
























































