
मुंबई सेंट्रल येथील गिल्डर लेनमधील हिरा मंजिल इमारतीला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील खोल्यांमध्ये आग पसरली होती. या वेळी तिसऱया मजल्यावर आणि इमारतीच्या गच्चीवर काही रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य राबवत तीन जणांची टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने, तर एका वृद्ध महिलेला जिन्यांवरून सुरक्षित बाहेर काढले.
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला रविवारी मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी आगीची माहिती मिळाली. नवजीवन सोसायटीजवळील हिरा मंजिल या तळमजला अधिक तीन मजल्यांच्या इमारतीच्या दुसऱया मजल्यावरील खोल्यांमध्ये आग लागली होती.
आगीच्या वेळी तिसऱया मजल्यावर अडकलेल्या एका पुरुषासह दोन महिलांची अग्निशमन दलाच्या जवानांनी टर्न टेबल लॅडरच्या सहाय्याने सुटका केली. तसेच पहिल्या मजल्यावर अडकलेल्या एका वृद्ध महिलेलाही जिन्यातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. सकाळी 8 च्या सुमारास आग आटोक्यात आली.



























































