
पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.’ने आपली सर्व उत्पादने पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा सोमवारी केला आहे. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSI) ‘असुरक्षित’ पाण्याच्या नमुन्याप्रकरणी कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास परवानगी दिल्याच्या वृत्तानंतर बिसलेरीने हे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.
https://t.co/qOBmfxcYj9
— BisleriZone (@BisleriZone) November 23, 2026
“पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता हे बिसलेरीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आमच्या १०-टप्प्यांच्या उत्पादन प्रक्रियेत ९० हून अधिक कडक गुणवत्ता चाचण्या केल्या जातात. योग्य त्या नियामक प्रक्रियेद्वारे या प्रकरणाचे निराकरण करण्यासाठी आम्ही एफएसएसएआयला सहकार्य करत राहू. गेल्या अनेक वर्षांपासून विश्वासार्ह असलेला बिसलेरी ब्रँड पिण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे,” असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
बिसलेरीचे पाणी सुरक्षित नसून, त्यात कर्करोगास कारणीभूत ठरणारे घटक आढळले आहेत. यासंदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर एफएसएसएआयने ‘बिसलेरी इंटरनॅशनल प्रा. लि.’ या कंपनीविरोधात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) कायदेशीर कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आहे.
नोटीस मिळाली नसल्याचा दावा
या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना बिसलेरीने स्पष्ट केले की, हा वाद सुमारे १४ महिन्यांपूर्वीचा, म्हणजेच सप्टेंबर २०२५ मध्ये गोवा येथील प्रकल्पात तयार झालेल्या एकाच बॅचशी संबंधित आहे. कंपनीच्या देशभरातील १४३ प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. तसेच, याप्रकरणी एफएसएसएआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष स्वरूपात मिळाली नसून, प्राधिकरणाच्या वेबसाइटवरही अशी कोणतीही नोटीस आढळली नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
बिसलेरी कंपनीच्या परिसरातून बाटलीबंद पाण्याचा एक नमुना तपासणीसाठी गोळा करण्यात आला होता. त्यात ‘ब्रोमेट’ हा घटक निर्धारित प्रमाणापेक्षा बराच जास्त आढळला. त्यामुळे कंपनीचे पाणी असुरक्षित असल्याचे जाहीर केले होते. कंपनीने अपील केल्यानंतर हा नमुना पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला. तेथेही या नमुन्यात ‘पॉलिन्युक्लिअर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स’ (Polynuclear Aromatic Hydrocarbons) आढळून आले आहेत
























































